गोरेवाड्यातील बिबट्याच्या तीन पिल्लांना मिळाले पालक 

राजेश रामपूरकर
Tuesday, 11 August 2020

ए. आर. कन्स्ट्रक्शनने दत्तक घेतलेल्या बिबट्याचे नामकरण ‘मुफासा' तर डॉ. भिवापूरकर यांनी घेतलेल्या मादी बिबट्याच्या बछड्याचे नामकरण ‘डायना’ असे केले आहे. तिन्ही कुटुंबांनी थाटामाटात यांचे पालकत्व स्वीकारले. चारपैकी एक बिबट अद्यापही दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहे. 

नागपूर : गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील आईपासून विभक्त झालेल्या तीन बिबट्यांच्या पिल्लांना पालक मिळाले आहे. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या धर्मपत्नी डॉ. आयुषी यांनी एक पिल्लाच्या पालकत्वाची जबाबदारी उचलली आहे. तसेच ए. आर. कन्स्ट्रक्शन आणि डॉ. रोषण भिवापूरकर यांनी प्रत्येकी एक बिबट पिल्लास दत्तक घेतले आहे. 

अकोला वन विभागातून १६ जुलै रोजी आईपासून विभक्त झालेले दीड महिन्याचे दोन नर आणि दोन मादी असे बिबट्याच्या चार पिल्लांना गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात आणले होते. या बिबट्यांना दत्तक योजनेअंतर्गत पालकत्व देण्यात आले आहे. एका बिबट्याच्या पिल्लासाठी ५० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. ए. आर. कन्स्ट्रक्शनने दत्तक घेतलेल्या बिबट्याचे नामकरण ‘मुफासा' तर डॉ. भिवापूरकर यांनी घेतलेल्या मादी बिबट्याच्या बछड्याचे नामकरण ‘डायना’ असे केले आहे. तिन्ही कुटुंबांनी थाटामाटात यांचे पालकत्व स्वीकारले. चारपैकी एक बिबट अद्यापही दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहे. 

हेही वाचा : वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; दोघांचा खून 

वन्यप्राण्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये वन्यप्राणी दत्तक योजना सुरू केली. त्यानुसार गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रामधील वन्यप्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्या आहार आणि औषधोपचारांचा वर्षभराचा खर्च त्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांचे महत्त्व व त्यांचे रक्षण याबाबत माहिती व्हावी, या कामासाठी सर्वसामान्य नागरिकांचा हातभार लागावा, या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत डॉ. सश्रुत बाभूळकर, डॉ. सुयाग रमेश रत्नपारखी व रीना सिन्हा यांनी वाघासह इतर प्राणी दत्तक घेऊन मदत केली आहे. गोरेवाड्यातील ९ वाघ, २३ बिबट, १० अस्वल सध्या पालकत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. 

(संपादन : मेघराज मेश्राम)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three leopard cubs from Gorewada got parents