नागपूर जिल्ह्यात केवळ ४.७७ टक्के सक्रिय कोरोनाबाधित 

केवल जीवनतारे
Thursday, 29 October 2020

सर्वाधिक रुग्णांचा भार मेडिकलवर आहे. राज्यात कोरोनाबाधितांसाठी १००० खाटा एकट्या मेडिकलमध्ये आहेत. गुरुवारी कोरोनाचे अवघे ३२४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नागपूर : कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. जिल्ह्यात १०४ कोविड रुग्णालयात सुमारे साडेचार हजार खाटा आरक्षित होत्या. सर्व खाटा महिनाभरापूर्वी हाऊसफुल्ल होत्या. मात्र आता केवळ १४३७ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे तीन हजारांपेक्षा अधिक खाटा रिक्त आहेत. 

सर्वाधिक रुग्णांचा भार मेडिकलवर आहे. राज्यात कोरोनाबाधितांसाठी १००० खाटा एकट्या मेडिकलमध्ये आहेत. गुरुवारी कोरोनाचे अवघे ३२४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणचा मृत्यू झाला आहे. या १३ मृत्यूंमध्ये शहरातील सहा तर ग्रामीण भागातील ९ असे नागपूर जिल्ह्यातील ९ मृत्यू आहेत. 

जिल्ह्याबाहेरील ४ जण नागपुरात दगावल्यामुळे मृत्यूचा आकडा १३ झाला आहे. यामुळे आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या ३ हजार ११० वर पोहचली आहे. तर बाधितांचा आकडा ९४ हजार ८९९ झाला आहे. त्या तुलनेत कोरोनामुक्तांचाही आकडा फुगला आहे. ५०८ रुग्ण आज बरे झाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा ८७ हजार २५९ झाला आहे.

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात
 

जिल्ह्यात आज ५ हजार ९४६ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी केवळ ३२४ जणांना बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यातील २४७ जण शहरातील आहेत, तर ७३ जण गावखेड्यातील आहेत. जिल्ह्याबाहेरच्या व्यक्तींनी केलेल्या चाचण्यातून ४जणांना बाधा झाल्याचे निदान झाले. 

या सर्व रुग्णांना मेयो, मेडिकलसह खासगीत दाखल करण्यात आले. यापैकी पन्नास टक्के पेक्षा अधिक रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख २३ हजार ७२९ चाचण्या झाल्या आहेत. यातील ३ लाख ३८ हजार ७६६ चाचण्या या आरटी पीसीआर झाल्या आहेत. तर उर्वरित २ लाख ८४ हजार ९७३ चाचण्या रॅपिड ॲटिन्जेन झाल्या आहेत. विशेष असे की, खासगी रुणालयात मोठ्या प्रमाणात चाचण्यात होत आहेत.

खासगीत पन्नास टक्के चाचण्या

गुरुवारी (ता.२९) नागपूर जिल्ह्यात झालेल्या ५ हजार ९४६ चाचण्यांपैकी २ हजार ३६८ अर्थात जवळपास ५० टक्के चाचण्या या खासगी प्रयोगशाळेत झाल्या आहेत. तर उर्वरित ५० टक्के चाचण्या या ५ सरकारी रुग्णालयात झाल्या आहेत. एम्समध्ये १३१, मेडिकलमध्ये ४९८, मेयोत ७१२, माफसूत ५६ , नीरीमध्ये १३९ तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १४१ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ३२४ जण बाधित आढळले आहेत.

मेडिकलमध्ये २१८ कोरोनाबाधित

राज्यात सर्वाधिक खाटा मेडिकलमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. सद्या मेयो, मेडिकल मध्ये प्रत्येकी ६०० खाटा आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्देशाननुसार मेडिकलमध्ये आणखी ४०० खाटा वाढविण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे मेडिकलमध्ये १ हजार खाटा आहेत. हजार खाटांच्या तुलनेत येथे २१८ तर मेयोत ६०० खाटांच्या तुलनेत ४२ तर एम्समध्ये ७० खाटांच्या तुलनेत ३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand beds of corona patients are empty in Nagpur district