अन्‌ त्याने फेकले तिच्या अंगावर गरम पाणी...वाचा काय झाले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

विवाहित असलेल्या प्रेयसीने प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संसार थाटला. मात्र यादरम्यान तिची अन्य युवकासोबत मैत्री झाली. प्रियकराने तिला त्या युवकासोबत फोनवर बोलताना रंगेहात पकडले आणि अनर्थ घडला. दोघांत कडाक्‍याचे भांडण झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर प्रियकराने झोपेत असलेल्या प्रेयसीच्या अंगावर उकळते पाणी टाकले आणि पळून गेला.

नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीच्या अंगाव गरण पाणी फेकले. प्रेयसीने आरडाओरड केल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मानकापूर पोलिसांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी सूरज यादव (वय 30) असे पीडित महिलेचे नाव आहे. सूरज प्रभुदयाल यादव (वय 50) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी लक्ष्मी आणि आरोपी सूरज हे मूळचे केडिया, जि. नरसिंगपूर (म. प्र.) येथे राहणारे आहेत. लक्ष्मीचे पहिले लग्न झाले असून पहिल्या पतीपासून तिला 13 वर्षाची मुलगी आहे.

पहिल्या पतीसोबत पटत नव्हते

पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने पतीने तिला सोडले होते. त्यानंतर लक्ष्मी आणि सूरज या दोघांनीही लग्न केले नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सूरजपासून तिला 10 वर्षाचा मुलगा आहे. दोघेही हातमजुरीचे काम करीत होते. मागील काही दिवसांपासून सूरज हा लक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांची भांडणे होत होती. 30 जानेवारीच्या सायंकाळी सूरज हा कामावरून घरी आला. त्याने लक्ष्मीला तिचा मोबाईल मागितला असता तिने मोबाईल दिला नाही. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सर्वजण झोपी गेले.

रात्री गरम पाणी केले

रात्री एकच्या सुमारास सूरज झोपेतून उठला. त्याने चुलीवर गरम पाणी केले. रात्री 2.30 च्या सुमारास लक्ष्मी गाढ झोपेत असताना सूरजने तिच्या अंगावर उकळते गरम पाणी ओतले. त्यामुळे ती झोपेतून जागी झाली आणि तिने आरडाओरड केली. गंभीर अवस्थेत तिला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेनंतर सूरज हा घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी 326 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

असे का घडले? : रात्रीच्या अंधारात ते भेटले, राजाला लागली कुणकुण आणि क्षणात झाले होत्याचे नव्हते

फोनवर कुणाशी बोलते?

लक्ष्मी ही फोनवर चोरून कुणाशीतरी बोलत असते, अशी कुणकुण सूरजला होती. त्यामुळे सूरजने तिच्यावर पाळत ठेवणे सुरू केले. सूरजने झोपेचे सोंग घेतले तर लक्ष्मी हळूच फोन काढून बाहेर बोलत उभी होती. सूरज हळूच तिच्या पाठीमागे येऊन चोरून संभाषण ऐकत होता. त्याने लगेच तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने फोन हातातून सोडला नाही आणि कॉल लॉग डिलीट केला. त्यामुळे सूरज हा लक्ष्मीवर चिडून होता, अशी माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: throw the boiling water on a lady at nagpur