सांग सांग भोलानाथ किती वाघ आहे या जंगलात?

Tigers count will start in 15 january
Tigers count will start in 15 january

नागपूर : राज्यातील वाघांचे अस्तित्व असलेल्या परिसरासह व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलातील वाघांची गणना 15 जानेवारीपासून करण्यात येईल. प्रशिक्षण, कॅमेरा ट्रॅप आणि "ट्रान्झेक्‍ट' पद्धतीने होणारी ही गणना तीन टप्प्यात होईल. त्यामुळे राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील वाघांची नेमकी संख्या आणि तृणभक्षक प्राण्यांची घनता कळेल. ही प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरपर्यंत राबविण्यात यावी असे निर्देशही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहे. 

वाघांची गणना व तृणभक्षक प्राण्यांची घनता राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य तसेच वाघांचा संचार असलेल्या वन विभागात होणार आहे. पहिला टप्प्याची सुरुवात 15 जानेवारीपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापासून होणार आहे.

त्यानंतर उपलब्धतेनुसार जंगलात कॅमेरा ट्रॅप लावणे आणि तिसऱ्या टप्प्यात "ट्रान्झिट लाइन'चा अवलंब करण्यात येईल. त्यासाठी या क्षेत्रातील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वाइल्ड लाइफ कन्झवेशन ट्रस्ट, वन्यजीव संशोधन आणि संवर्धन सोसायटी या तज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. 

सहा दिवस चालणाऱ्या ट्रान्झिट लाइनच्या गणनेत पहिले तीन दिवस मांसभक्षक प्राणी गणना व प्राणी भ्रमण मार्गावर फिरणे तसेच उर्वरित तीन दिवस तृणभक्षक प्राणी नोंदीसाठी दोन ते तीन किलोमीटरच्या ट्रान्झिटवर फिरावे लागेल.

महाराष्ट्रातील मेळघाट, पेच, ताडोबा अंधारी, बोर, नागझिरा-नवेगाव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वाघाचे अस्तित्व असलेले अभयारण्य, संरक्षित क्षेत्रासह पांढरकवडा, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचा परिसर, जळगावशेजारील जंगल, औरंगाबाद, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही गणना होणार आहे. पैनगंगा व प्राणहिता या अभयारण्यात वाघांची संख्या कमी आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅप लावणे अशक्‍य असल्याने या परिसरात वाघांच्या पायांचे ठसे, झालेल्या शिकारीचा प्रकार तसेच विष्ठा याचा अभ्यास करून आकडेवारी संकलित करण्यात येईल. 

नेमकी आकडेवारी पुढे येईल

गणनेमुळे राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि वाघांचे अस्तित्व असलेल्या जिल्ह्यात वाघांची संख्या किती याची नेमकी आकडेवारी पुढे येईल. 2018 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने राष्ट्रीयस्तरावर वाघांची गणना केली. त्यात देशातीलच नव्हे तर राज्यातील वाघांच्या संख्येत 30 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनात आले.

गेल्या चार वर्षांत राज्यातील वाघांची संख्या 190 वरून 312 वर पोहोचली आहे. मात्र, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पासह विदर्भातील वाघांची नेमकी आकडेवारी किती तो आकडा पुढे आलेला नाही. या गणनेतून ती आकडेवारी पुढे येणार आहे. ही गणना एनटीसीएच्या निर्देशानुसार दरवर्षी करण्यात येत असली तरी या गणनेला यंदा विशेष महत्त्व आहे. या गणनेसाठी नोडल अधिकारी म्हणून मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांची नियुक्ती केली आहे.

आकडे बोलतात     
वर्ष वाघांची संख्या (देश) महाराष्ट्र
2006 1411 103
2010 1706 169
2014 2226 190 
2018 2967 312 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com