total death in Nagpur is less this year as compared to last year
total death in Nagpur is less this year as compared to last year

कोरोना काळातही नागपूरकरांची मृत्यूला चपराक, आकडेवारी वाचून व्हाल अवाक्

नागपूर  ः शहरात कोरोनाचा बळी एप्रिलमध्ये आढळून आला. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत नागपूरकरांनी मृत्यूला चपराक दिल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एप्रिल-ऑगस्ट व यंदाच्या पाच महिन्यांतील मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केल्यास १६३३ मृत्यूंची घट झाली आहे. कोरोनाच्या काळात घरातच राहणे, व्यायाम, पौष्टिक आहारावर भर दिल्याने इतर आजारांपासून होणाऱ्या मृत्यूत घट झाल्याचे चित्र आहे.

शहरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात बळी घेतले. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा अंदाज वेगवेगळ्या पातळ्यावर बांधण्यात आला. परंतु प्रत्यक्षात चित्र उलटे असल्याचे माहिती अधिकारातून बाहेर आलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांमध्ये २९ हजार ४२६ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टपर्यंत झालेल्या मृत्यूची माहितीही महापालिकेने दिली. 

गेल्या आठ महिन्यांत १६ हजार ८३२ मृत्यूची नोंद करण्यात आली. यंदा मार्चपासून शहरात कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. एप्रिलमध्ये सतरंजीपुरा येथे कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद करण्यात आली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत एकूण ९ हजार ७९० मृत्यूची नोंद करण्यात आली. मागील वर्षी याच पाच महिन्यांत ११ हजार ४२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

मागील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दररोज ७६ जणांचा मृत्यू झाला तर यंदा याच काळात दररोज ६५ जणांचा मृत्यू झाला. यंदा कोरोनामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर मृत्यूची नोंद झाली असून, नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या काळातील मृत्यूसंख्या कमी असल्याने नागपूरकरांनी घरांमध्येच राहून दाखविलेल्या संयमाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. 

लॉकडाऊनचा काळ तसेच अनलॉकनंतरही महापालिका, राज्य सरकारने नागरिकांच्या आरोग्यासाठी लावलेले निर्बंध, घरात राहूनही व्यायामाला पसंती, पौष्टिक आहारामुळे इतर आजाराने तोंड वर न केल्याने मृत्यूची संख्या कमी असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मागील वर्षी व यंदा एप्रिल-ऑगस्टमधील मृत्यू

  • एप्रिल २१५९    १५२०
  • मे २३४४    १३९९
  • जून २३९५    २०४९
  • जुलै २१९८    २२२०
  • ऑगस्ट २३२७    २५९५
     
  • एकूण ११,४२३ ९७९०

आजारी पडण्याचे प्रमाण घटले 
लॉकडाऊनमुळे प्रदूषणातील घट, बाहेरील खाद्यपदार्थांवर बंधने, पुरेशा विश्रांतीमुळे रोग प्रतिकारशक्तीत वाढ झाली. वेळेत झोप, वेळेत जेवण, कुटुंबातील लोकांशी संवाद, छंद जोपासल्याने मानसिक आरोग्यही सुदृढ झाले. योगासन व व्यायाम करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण घटले आहे. व्यसनाधीनचेही प्रमाण घटले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले.
डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल. 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com