
नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांसह स्वतःची चाचणी करण्याचे निर्देश दिले असून त्याला चेंबरचा विरोध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचे उत्पन्न बुडाले, आता सम-विषममुळेही व्यवसायावर टांगती तलवार असल्याने आधीच त्रस्त झालेली व्यापारी आयुक्तांच्या निर्णयाविरोधात संतप्त झाले आहे. या अन्यायाविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने १९ ऑगस्ट रोजी व्यापार बंदचे आवाहन केले आहे.
मनपा आयुक्त चाचण्या करण्याची सक्ती करीत असताना चाचणी केंद्रावर चाचणी किटची उपलब्धता नाही. या आदेशाला चेंबरने प्रांरभीपासूनच विरोध केलेला आहे. मनपा आयुक्त नवनवीन कायदे आणून व्यापाऱ्यांना वेठीस धरीत आहे. व्यापाऱ्यांना व्यापार, व्यवसाय करण्यासाठी महानगर पालिकेची परवानगी घेणे सक्तीचे केलेले आहे. पंतप्रधान इन्स्पेक्टर राज बंद करण्यावर भर देत आहे. असे असताना मात्र, मनपा आयुक्त इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करीत आहे. लहान व्यापाऱ्यांनी जीएसटी, गुमास्ता लायसन्, केंद्राचा डायरेक्ट टॅक्स अंतर्गत नोंदणी केलेली आहे. त्यानंतर पुन्हा मनपामध्ये नोदणी करण्याचा घाट घातला जात आहे. जीएसटीमुळे आता स्थानिक कर आकारता येत नाही असे असताना मनपा आयुक्तांकडून नवीन कर आकारण्याचे षड्यंत्र आखले जात आहे, असाही आरोप एनसीसीएलचे अध्यक्ष विष्णुकुमार पचेरिवाला यांनी केला आहे. एनसीसीएलतर्फे महापौर संदीप जोशी यांना निवेदन दिले. त्यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप जाजू, गोविंद पसारी, सहसचिव तरुण निर्वाण, नितीन बंसल उपस्थित होते.
दरम्यान, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलाश जोगानी यांनी संदीप जोशी यांची घेराव करून निवेदन दिले. तसेच व्यापाऱ्यांच्या अडचणीचा पाठा वाचला. यावेळी संदीप जोशी यांनी नवीन कायदा लागू होऊ देणार नाही. त्याला सभागृहात विरोध करण्यात येईल असेही आश्वासन दिले.
मनपा आयुक्त यांच्या कारभाराविरुद्ध आज नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर मोबाईल डिलर असोसिएशन. इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशन, गांधीद्वार व्यापारी सेवा मंडळ, होलसेल क्लॉथ मार्केट असोसिएशन, किराणा मार्केट असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, प्लायवूड असोसिएशन,. महात्मा फुले मार्केट जनरल मर्चड वेलफेअर असोसिएशन आदी संघटनांनी महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. नवीन कायदा पास करण्यात येऊ नये अशी मागणी केली. यावेळी एनव्हीसीसीचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतीया, एनव्हीसीसीचे उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सचिन पुनियानी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.