(Video) नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

file photo
file photo

नागपूर :  टाळेबंदीमुळं सारंकाही थांबलं आहे. स्थलांतरित मजुरांच्या दोन वेळच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. पशुपक्ष्यांना बघण्यासाठी माणसं पर्यटन करत होती. तेही थांबलं. मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याने वन्यप्राणी शहराकडे येऊ लागले असताना, 'मदर्स डे'च्या दिवशी आईपासून विभक्त झालेल्या माकडाचे पिल्लू बेवारस स्थितीत वन कर्मचाऱ्यांना दिसले. वन कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा आईजवळ सोडण्याचा प्रयत्न केला; मात्र यात अपयशी आले. आईच्या प्रेमासाठी व्याकूळ झालेल्या माकडाच्या पिलाला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवले आहे. आता आईकडून लहानपणी मिळणारे जगण्याचे 'धडे' त्याला व्हिडिओ दाखवून देण्याचा आगळावेगळा प्रयोग प्रथमच केला जात आहे. 

प्राण्यांनाही माणसासारख्या भावना असतात, हे चीनमध्ये झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्याचा प्रत्यय आता येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील माकडाच्या पिलाच्या पालनपोषणावर येत आहे. वानर तहान-भुकेने व्याकूळ झाले की ते कुहू...कुहू..करीत धावत येथील वन कर्मचाऱ्यांकडे येतो. ते मायेने त्याला कुरवाळतात. खाऊ-पिऊ घालतात. त्यामुळे घरातल्या जीवाप्रमाणेच या माकडाच्या पिलालाही मनुष्याच्या प्रेमाचा लळा लागला आहे. 

'मदर्स डे'च्या दिवशीच आईपासून विभक्त झालेले माकडाचे पिलू. त्याला तातडीने त्याच्या आईपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईने पिलाला सोबत न नेता जंगलात धूम ठोकली. खूप वेळपर्यंत वाट बघितली; मात्र ती कायमचीच जंगलात पसार झाली. त्यानंतर पिलाला पुन्हा ट्रान्झिट सेंटरमध्ये आणण्यात आले. आता त्याची आईसारखी काळजी घेण्यात येत आहे. आईकडून जंगलात पिलाला जे काही शिकविण्यात येते, ते मनुष्य शिकवू शकत नाही. मात्र, त्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे कर्मचारी आणि डॉक्‍टरांनी युक्ती शोधली. पिलाला माकडाचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवून बाळकडू दिले जात आहे. माकडांची वेगवेगळी अवस्था, आवाज ऐकवण्यात व दाखवण्यात येत आहे. त्याला तो प्रतिसादसुद्धा देत आहे. तो थोडा अशक्त आहे; पण हळूहळू गुटगुटीत होईल, अशी अपेक्षा आहे. 
 

माकडाच्या पिलाचे व्हिडिओ बघतानाचे हावभाव सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हा एक वेगळाच अनुभव आहे. त्याच्या संपूर्ण हालचाली लहान बाळासारख्या आहेत. जसा तो त्याच्या आईला बिलगून बसतो, तसा येथील कर्मचाऱ्यांच्या अंगाला बिलगून बसतो आणि खेळतोसुद्धा. त्याला मोठे करणे आणि अधिवासात सोडणे आव्हान आहे. त्यासाठी वन विभागाची चमू सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 
-कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com