आर्थिक अडचणीमुळे रोख परत करणे शक्‍य नाही; मात्र, विश्‍वास ठेवा, सहलीला नक्की नेऊ

Travel industry reassurance to passengers for trip
Travel industry reassurance to passengers for trip

नागपूर : टाळेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सोडा, अगदी जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशावेळी पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. हे सर्व संपून पुन्हा प्रवासाला कधी सुरुवात करणार याबद्दलच्या अनिश्‍चिततेनंही ट्रॅव्हल इंडस्ट्रीला ग्रासले आहे. अशा स्थितीत नागपूर टूर्स ऑर्गनायझेशने सहलीचे बुकिंग केलेल्या पर्यटकांना पुढील सहलीत समाविष्ट केले जाईल असा विश्‍वास दिला. आर्थिक अडचणीमुळे प्रवाशांना रोख रक्कम परत करणे शक्‍य नाही. मात्र, विश्‍वास ठेवा सहलीला नक्की नेऊ असे आश्‍वासन दिले आहे.

कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आहे. सध्याच्या परिस्थितीत सहली आयोजित करणे अशक्‍य आहे. 23 मार्च 2020 पासून टाळेबंदी लावण्यात आल्याने प्रवासावर निर्बंध आलेले आहेत. परिणामी, सर्व सहली शासनाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांकडून या सीझनच्या बुकिंगसाठी घेण्यात आलेले पैसे तुम्ही पुढे वापरू शकता, असे सांगितले जात आहे. पण, पुढे म्हणजे कधी? इथे आता उद्याचीच शाश्वती नाही. त्यामुळे लोकांना रिफंडच हवा आहे. पण, ट्रॅव्हल कंपन्यांचेही पैसे विमान कंपन्या, हॉटेल्सकडे अडकलेले आहेत.

अशावेळी पर्यटकांसह सगळ्यांसाठी तोट्याचे झालेले आहे. कंपन्यांनी प्रवाशांनी दिलेली अग्रीम रक्कम बस, विमान, निवास व्यवस्थेत गुंतवलेली आहे. तेथूनच रक्कम परत मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होऊ नये याकरिता पुढील कोणत्याही सहलीत त्यांना समायोजित करावे असा निर्णय टूर्स ऑर्गनायझेशनच्या कार्यकारणीने घेतला आहे.

नागपूर शहरात 125 पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. त्या देश-विदेशात सहलीचे आयोजन करीत असतात. त्यासाठी एक ते सहा महिन्यापूर्वी नियोजन आणि बुकिंग करीत असतात. यामाध्यमातून शहरासह विविध ठिकाणच्या दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळत असतो. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद पडल्याने हे सर्वच बेरोजगार झालेले आहेत.

आम्हीही आर्थिक अडचणीत

प्रवाशांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांचा विश्‍वास तडीस जाऊ देणार नाही. प्रवाशांना सर्वतोपरी सहकार्य करू. आर्थिक अडचणीमुळे प्रवाशांना रोख रक्कम परत करणे शक्‍य नाही, सहकार्य करावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशपांडे व सचिव चंद्रशेखर कुमेरिया यांनी केले आहे.

ऑप्शन नसल्याने जॉबलेस

ट्रॅव्हल इंडस्ट्री मुळातच प्रवासाशी संबंधित आहे आणि आता कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला आहे. टूर मॅनेजरचे काम हे पर्यटकांसोबत फिरणे हे आहे. "वर्क फ्रॉम होम' असा ऑप्शनच आमच्याकडे नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आम्ही "जॉबलेस' असल्यासारखेच आहोत असे पर्यटन कंपनीचे टूर मॅनेजर म्हणून काम करणारा भूषण शिंदे सांगत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com