खासगी चालकांची आर्थिक चाके खोलात, ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

आषाढ महिन्यात पंढरपूरची यात्रा, श्रावणातील पंचमढी यात्रेदरम्यानही मागणीत वाढ होते. प्रतिकिमी 10 ते 15 रुपयांचा दर मिळत असल्याने खासगी वाहनचालकांच्या हातात मोठी रक्कम पडते.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा, पर्यटन, सोहळे बंद असल्याने खासगी वाहनांनाही ब्रेक लागले आहेत. आर्थिक चाकच खोलात रुतून बसल्याने कुटुंबाचा गाडा रेटायचा तरी कसा, हा प्रश्‍न खासगी वाहनचालकांसमोर आवासून उभा ठाकला आहे. त्यातच कर्जाचे हप्ते चुकत असल्याने दुहेरी कचाट्यात हे चालक अडकले आहेत.

उन्हाळ्यात पर्यटनाचा हंगाम जोरावर असतो. त्यातच लग्न व अन्य सोहळ्यांसाठीही वाहनांची मागणी मोठी असते. त्यापाठोपाठ धार्मिक यात्रांचा हंगाम सुरू होतो. आषाढ महिन्यात पंढरपूरची यात्रा, श्रावणातील पंचमढी यात्रेदरम्यानही मागणीत वाढ होते. प्रतिकिमी 10 ते 15 रुपयांचा दर मिळत असल्याने खासगी वाहनचालकांच्या हातात मोठी रक्कम पडते. कर्जाचे हफ्ते, इंधनाचा खर्च आणि घरखर्च भागवूनही मोठी रक्कम शिल्लक राहत असल्याने या व्यवसायात असणाऱ्यांची संख्या अगदी हजारोंच्या संख्येने आहे.

अमरावतीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; एकूण मृत्यू सतरा

वाहनासाठी बॅंकांकडून सहजतेने कर्ज मिळत असल्याने अगदी गावपातळीपर्यंत या व्यवसायाची व्याप्ती विस्तारली आहे. प्रत्येक गावखेड्यातही किमान एक खासगी वाहनचालक या व्यवसायात असतोच. कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाउन झाला. त्यासोबतच या व्यवसायालाही ब्रेक लागले. उन्हाळ्याचा संपूर्ण हंगाम वाया गेला. त्यात पुढे येणाऱ्या यात्रांवरील संकटही कामयच आहे. महत्त्वाचा हंगाम नसल्याने खासगी वाहनचालकांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कर्जाचे हप्ते बुडत असल्याने आर्थिक संकट अधिकाधिक गडद होत आहे.

हा व्यवसाय असंघटित स्वरूपाचा आहे. शिवाय आरटीओचा अधिकृत परवाना न घेताच हा व्यवसाय केला जात असल्याने कुणाकडे दुखणेही मांडता येत नाही, अशा दुहेरी कैचीत हे चालक सापडले आहेत. "कोणती मेहरबानी करू नका, केवळ चुकणाऱ्या हप्त्यांवरील व्याज तेवढे माफ करा, परवान्यांना मुदतवाढ द्या', एवढीच खासगी वाहनचालकांची अपेक्षा आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel, tourism, ceremonies closed; Private drivers brake economic wheel