अधिकारी, कर्मचारी येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला पदभार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

कर्तव्यदक्ष आयएसएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे एरव्ही बऱ्याचदा वेळेवर न येणारे अधिकारीही दहाच्या ठोक्‍याला मनपाच्या कार्यालयात दाखल व्हायला सुरुवात केली होती. 

नागपूर : बदलीचे आदेश आल्यानंतरही आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल न झाल्याने त्यांची नागपुरातील नियुक्ती रद्द झाल्याच्या अफवांनी जोर धरला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता अधिकारी व कर्मचारी येण्यापूर्वीच पदभार स्वीकारल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. पदभार स्वीकारताच मुंढे यांनी एचओडी यांची बैठकही घेतली. तुकाराम मुढे महापालिकेत दाखल झाल्याने सर्वांमध्ये धावपळ माचली होती. 

मंगळवारी (ता. 21) सायंकाळी राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालकपदावरून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेशही त्यांच्यासह महापालिकेतही पोहोचले. त्यांना तत्काळ कार्यभार घेण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले होते. त्यामुळे मुंढे नागपुरात पोहोचतील, अशी चर्चा होती. मात्र, ते न आल्याने त्यांची बदली रद्द झाल्याच्या चर्चेला उत आला होता. 

कर्तव्यदक्ष आयएसएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे एरव्ही बऱ्याचदा वेळेवर न येणारे अधिकारीही दहाच्या ठोक्‍याला मनपाच्या कार्यालयात दाखल व्हायला सुरुवात केली होती. 

मेट्रो उद्‌घाटनाला भेट

हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या उद्‌घाटनाला महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी एचओडी यांची बैठक घेतली. यानंतर लगचे मेट्रोच्या उद्‌घाटनाला भेट दिल्याने त्यांच्या कामाच्या धडाक्‍याला सुरुवात झाल्याचे दिसून येते. 

मुंढे येण्यापूर्वीच आवरासावर

तुकाराम मुंढे महापालिकेत येणार असल्याच्या वृत्ताने नागपूरकरांत त्यांच्याबाबत उत्सुकता दिसून येत होती. सत्ताधाऱ्यांचे विरोधकही तक्रारीची फाईल घेऊन बसले होते. महापालिकेतही त्यांच्या स्वागताची लगबग दिसून आली. आयुक्त कक्षात आवराआवर सुरू होती. प्रशासकीय इमारतीत विविध प्रजातींच्या झाडांच्या कुंड्या व्यवस्थित ठेवण्यात येत होत्या. त्यांच्या कामाची धडाडी बघता कुठेही काहीही चुकू नये, यासाठी अधिकारी स्वतः त्यांचा कक्ष व परिसरावर लक्ष ठेऊन होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Mundhe took over