तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जून 2020

राज्य सरकारने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून महापालिका आयुक्त मुंढे यांनी कुणाचीही गय न करता कोविड सेंटर असो की नागरिकांना, सक्तीने विलगीकरणात पाठविण्याचा निर्णय धडाडीने घेतला. त्यांनी सोयीस्कररीत्या या निर्णयापासून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दूरच ठेवले. परिणामी महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी आहेत की नाही? अशी शंका निर्माण व्हावी, असे चित्र आहे.

नागपूर :  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र, त्याचवेळी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे दुखावलेले त्यांच्याविरोधात उभे ठाकले. त्यांच्या या विरोधकांनी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना कोरोनाच्या उपाययोजनांचे श्रेय देण्यास प्रारंभ केला. सोशल मीडियावर प्रथमच दोन अधिकाऱ्यांचे समर्थक आमन-सामने दिसून येत आहेत.

राज्य सरकारने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून महापालिका आयुक्त मुंढे यांनी कुणाचीही गय न करता कोविड सेंटर असो की नागरिकांना, सक्तीने विलगीकरणात पाठविण्याचा निर्णय धडाडीने घेतला. त्यांनी सोयीस्कररीत्या या निर्णयापासून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दूरच ठेवले. परिणामी महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी आहेत की नाही? अशी शंका निर्माण व्हावी, असे चित्र आहे.

कोरोनासंदर्भातील उपाययोजना व राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप धुडकावून लावणे, या वृत्तीमुळे शहरात त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झाला असून, सोशल मीडियावर त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगाण करताना दिसून येत आहे. मात्र, त्याचवेळी सर्व निर्णय स्वतःच घेत असल्याने महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांत नाराजी आहे. यातूनच आयुक्तांचे मोठ्या प्रमाणात विरोधकही तयार झाले आहेत. शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी घेतलेल्या निर्णयाचेही कौतुक होत आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिस चौक, प्रतिबंधित क्षेत्रात डोळ्यांत अंजन घालून पहारा देत आहेत. त्यामुळे आयुक्त मुंढे यांच्या विरोधकांनी डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास प्रारंभ केला. शहरातील एका दिग्गज नगरसेवकाने त्यांच्या समर्थनार्थ प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व संयमी अधिकारी अशी पोस्ट टाकली. त्यावर शेकडो नेटकऱ्यांनी "कमेंट' केल्या. यात काही मुंढे समर्थक तर काहींनी डॉ. उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव केला. आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या समर्थकांत प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियावर संघर्ष दिसून आला. आता प्रथमच दोन अधिकाऱ्यांच्या समर्थक आमने-सामने आहेत.

अवश्य वाचा- ...अन्‌ कुटुंबीय म्हणाले तुम्हीच करा अंत्यसंस्कार; फक्‍त येताना अस्थी घेऊन या

मुंढे समर्थकाची नगरसेवकालाच धमकी

काही दिवसांपूर्वी महापालिकेतील विधी समिती सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी आयुक्तांच्या वक्तव्यावर पत्रकार परिषद घेतली. माध्यमाच्या एका प्रतिनिधीने या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ऍड. मेश्राम यांनी आयुक्तांना जाब विचारल्याने या पोस्टवर कमेंट करीत चक्क एका मुंढे समर्थकाने ऍड. मेश्राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Mundhe V/s Dr. Upadhyay on social media