नागपूरात कोरोनाचे एकाच दिवशी दोन मृत्यू ! मृत्यूसंख्या 29, कोरोना बाधितांचा आकडा 1894 वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

हळूहळू उपराजधानीची स्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आहे. दोन मृत्यूंसह 25 जणांना बाधा झाल्याचे निदान झाले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 1894 वर पोहचला आहे.

नागपूर :  मेयोच्या कोविड हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात अमरावती येथील 71 तर मध्यप्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तींचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले आहे.

हळूहळू उपराजधानीची स्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आहे. दोन मृत्यूंसह 25 जणांना बाधा झाल्याचे निदान झाले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 1894 वर पोहचला आहे.

अमरावती येथील 71 वर्षीय व्यक्ती दोन दिवसांपुर्वी मेयोत दाखल झाला होता. मात्र या वृद्ध व्यक्तीला उच्च रक्तदाब, ह्दयविकार होता. दोन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. सोबतच गंभीर स्वरुपाचा मधुमेह होता. अशातच या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. कोरोनामुळे श्‍वसन यंत्रणा निकामी झाली. तर फुफ्फुसही निकामी झाले. हाय फ्लो नोझल ऑक्‍सिजन मास्क लावण्यात आले, परंतु उपचाराला दाद मिळाली नाही. अखेर त्यांचा रात्री उशीरा मृत्यू झाला.

यानंतर अवघ्या काही तासानंतर मध्यप्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल मेयोतून प्राप्त झाला होता. कोविड, न्युमोनियासह ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे सिवनीतील व्यक्ती दगावला. यांनाही उच्चरक्तदाबासह मधुमेह होता. दोन्ही व्यक्तींना कोरोना झाल्यानंतर जोखीम होती. डॉक्‍टरांनी त्यांना वाचवण्याचे निकराचे प्रयत्न केले, परंतु डॉक्‍टरांना यश आले नाही. अखेर एकाच दिवशी उपराजधानीत दोन मृत्यूंची नोंद झाली.

हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत सात कोरोना बाधित, राज्य राखीव दलाच्या तीन जवानांचाही समावेश

 कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा 29 वर पोहचला आहे. तर अवघ्या एक ते आठ जुलैदरम्यान 385 कोरोनाबाधितांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 1894 वर पोहचला आहे. दिवसेदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकाच दिवशी 2 मृत्यू होण्याची 3 री वेळ
उपराजधानीत एकाच दिवशी दोन मृत्यू होण्याची ही तिसरी वेळ आहे. 4 जून रोजी अमरावती आणि मध्यप्रदेशातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यानंतर 26 जून रोजी मोमीनपुरा आणि गोंदियातील एका व्यक्तीचा मृत्यू मेयो रुग्णालयात झाला होता. यानंतर बुधवार 8 जुलै रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यात अमरावती आणि मध्यप्रदेशातील व्यक्तींचा मेयोत मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two corona death in Nagpur