लॉकडाउनवरून प्रशासनात दोन गट, वाचा सविस्तर

नीलेश डोये
Sunday, 13 September 2020

लॉकडाउनवरून प्रशासानातच दोन गट पडल्याचे दिसून येते. यापूर्वी विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही लॉकडाउनला विरोध दर्शवला होता.

नागपूर  : कोरोना नियंत्रणासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत लॉकडाउनवरून वादळी चर्चा झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच मेडिकल, मेयोच्या अधिष्ठातांनी जोरदार समर्थन केले. तर पालकमंत्री नितीन राऊत आणि नोडल अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी याला विरोध दर्शवला. त्यामुळे लॉकडाउनवरून प्रशासानातच दोन गट पडल्याचे दिसून येते. यापूर्वी विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही लॉकडाउनला विरोध दर्शवला होता.

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून शहरात सामुहिक संसर्ग वाढला आहे. रुग्णांच्या संख्येचा आलेखही सतत चढा आहे. यामुळे पोलीस, डॉक्टरांवरील ताण वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन आवश्यक असल्याची भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत मांडली. पूर्वीचे आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी लॉकडाउनला विरोध दर्शविला होता, हे विशेष. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनीही पोलीस आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले. नागरिक घरीच राहिल्याने रुग्णालयांवरील ताण कमी होईल. उपचार करण्याचे सोईचे होईल, असे मत त्यांनी मांडले.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी! आग्रह मराठीचा आणि आदेश इंग्रजीत, सगळा सावळागोंधळ -

कोरोनाच्या नोडल अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी मात्र लॉकडाउनला विरोध दर्शवला. यामुळे गरिबांचे हाल होतील. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात समाजसेवी आणि लोकप्रतिनिधींनी मदत केली. त्यांच्याही मर्यादा आहेत. पूर्वीप्रमाणे आता मदत मिळेलच असे सांगता येत नाही. मलाही फोन,एसएमएस येतात. ते बहुतांशी सधन लोकांचे आहेत. गरिबांचाही विचार झाला पाहिजे. नागरिक घरीच राहिल्याच याचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त राहील, असे खोडे म्हणाल्या. आता लॉकडाउनची वेळ नाही. पूर्वीच करायला पाहिजे होते, असे मत काहींनी मांडले. पालकमंत्री डॉ. राऊत यांनीही लॉकडाऊनला नकारात्मता दर्शवत मृत्यूदर आटोक्यात आणण्याच्या सूचना करीत तूर्तास लॉकडाउन होणार नसल्याचे स्पष्ट केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी माहिती मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two groups in the administration on lockdown