व्वा... कोराडीच्या कॉलेजमधून निघाले दोन आयपीएल स्टार ! 

file photo
file photo

नागपूर : एकेकाळी कोराडीच्या तायवाडे कॉलेजचा विद्यार्थी राहिलेला विदर्भाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव आयपीएल खेळत असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र याच संस्थेच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा आणखी एक विद्यार्थी अब्दुल समद फारूकही सध्या आयपीएल गाजवतो आहे. या दोन आयपीएल स्टार्समुळे कोराडी क्रिकेटच्या नकाशावर आले आहे. 


सच्छिदानंद शिक्षण संस्थेतर्फे संचालित कोराडीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून उमेश बी. ए. करीत आहे. याच संस्थेच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात जम्मू काश्मीरचा अब्दुल समदही तीन वर्षांचा बीपीई कोर्स करीत आहे. उमेशप्रमाणेच अष्टपैलू अब्दुलही क्रिकेटपटू असून, आयपीएल खेळत आहे. लेगस्पिनर अब्दुलने दोन दिवसांपूर्वी सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक षटकार व एका चौकारासह अवघ्या सात चेंडूंत नाबाद ११ धावा काढून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याच्या या छोट्याशा खेळीमुळेच हैदराबादला ४ बाद १६२ अशी धावसंख्या उभारता आली व नंतर सामना जिंकता आला. उंचपुऱ्या अब्दुलने क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी करत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा सुंदर झेल पकडला. 


जम्मू येथून बारावी झाल्यानंतर समदने गतवर्षी बीपीईला प्रवेश घेतला. क्रिकेटच्या व्यस्ततेमुळे तो क्लासेस करू शकला नाही. त्यामुळे अब्दुलचे वडील महंमद फारूक हेच कोराडीला येऊन मुलाची शैक्षणिक औपचारिकता पूर्ण करीत आहेत. क्रिकेटमधून वेळ काढून कधीकधी अब्दुलही कॉलेजमध्ये यायचा, अशी माहिती महाविद्यालयात कार्यरत क्रीडा शिक्षक संजय भोतमांगे यांनी सांगितले. अब्दुलचा थोरला भाऊ तय्यबसुद्धा उत्तम क्रिकेटपटू असून, याच कॉलेजमधून बीपीएड करीत आहे. शासकीय सेवेत असलेले महंमद यांचेही विदर्भाशी जवळचे नाते आहे. त्यांनी १९९१ मध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातून सीपीएड केल्यानंतर यवतमाळ येथील एका कॉलेजमधून बीपीएड पूर्ण केले. महंमददेखील उमेदीच्या काळात क्रिकेट खेळले होते. मध्यमगती गोलंदाज राहिलेले महंमद यांनी अमरावती येथील आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते. 


मुलगा आयपीएलमध्ये खेळत असल्याबद्दल परिवार खुश आहे. दिल्लीविरुद्ध अकरामध्ये स्थान मिळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. या कामगिरीमुळे पुढील सामन्यातही त्याला संधी मिळेल, अशी परिवाराला आशा आहे. त्यांना अब्दुलला भारतीय संघाकडून खेळताना पाहण्याची इच्छा आहे. गतवर्षी झालेल्या आयपीएल लिलावात हैदराबादने २० लाखांची बोली लावून अब्दुलला संघात घेतले होते. आयपीएलमध्ये खेळणारा तो जम्मू काश्मीरचा चौथा क्रिकेटपटू आहे. लेगस्पिनर असलेल्या १८ वर्षीय अब्दुलने २०१९-२० मधील रणजी सामन्यांमध्ये शंभरपेक्षा अधिकच्या सरासरीने ५९२ धावा काढल्या होत्या. याशिवाय त्याने सर्वाधिक ३६ षटकारही मारले होते. विजय हजारे करंडक स्पर्धेतील जयपूर येथील सामन्यात लेगस्पिनर पीयूष चावलाला ठोकलेले चार षटकार आणि त्यानंतर मुश्ताक अली चषक टी- २० स्पर्धेत केलेल्या आक्रमक फलंदाजीने हैदराबादचे निवडकर्ते प्रभावित झाले होते. 

संपादन : नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com