उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा विकास करणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

हिंगणा मार्गावरील ऍक्वा लाइनवर लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंज या 11 किमीच्या मार्गावरील दहापैकी सहा स्टेशन तयार झाले आहेत. लोकमान्यनगर ते सीताबर्डीपर्यंत अंतर पार करण्यासाठी सध्या नागरिकांना दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने 30 ते 40 मिनिटांचा अवधी लागतो. आता लोकमान्यनगरपासून सीताबर्डी नागरिकांना मेट्रोतून 20 मिनिटांत गाठता येईल.

नागपूर : हिंगणा मार्गावरील मेट्रोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय गृहनिर्माण, नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी (ता. 28) व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले. राज्य व केंद्र सरकारने हातात हात घालून महाराष्ट्रातील प्रत्येक शहराच्या विकासावर भर देणार आहे. नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देतो. याचे श्रेय जनतेला जाते. कोणत्याही विकासकामाला विरोध करणार नाही हे वचन देतो. विकासाचा वेग नक्कीच साधू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

हिंगणा मार्गावरील महामेट्रोचे मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण झाले. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी प्रत्यक्षरित्या हिरवी झेंडी दाखवली. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. 

तसेच आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार समीर मेघे, आमदार विकास ठाकरे यांचीही उपस्थित होती. या मार्गावर लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन तयार झाली आहेत. 

हिंगणा मार्गावरील ऍक्वा लाइनवर लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंज या 11 किमीच्या मार्गावरील दहापैकी सहा स्टेशन तयार झाले आहेत. लोकमान्यनगर ते सीताबर्डीपर्यंत अंतर पार करण्यासाठी सध्या नागरिकांना दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने 30 ते 40 मिनिटांचा अवधी लागतो. आता लोकमान्यनगरपासून सीताबर्डी नागरिकांना मेट्रोतून 20 मिनिटांत गाठता येईल. हिंगणा शहरातील प्रवासी, एमआयडीसी कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 

श्रेयवादावरून जुगलबंदी

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी श्रेयवादावरून चांगलीच जुगलबंदी रंगली. सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित असल्याने प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपणच ही मेट्रो आणल्याचा दावा केला. कॉंग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मेट्रोची मूळ संकल्पना ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडल्याचा दावा केला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर मेट्रोच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळेच आज मेट्रोचा हा कार्यक्रम होत असल्याचे नमूद केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागे लागून या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हणत, आपलाही दावा दाखल केला. 

लोकमान्यनगर ते सीताबर्डी 20 रुपयांत

सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किंवा वासुदेवनगरपर्यंत प्रवासासाठी तिकीट दर 20 रुपये आहेत. सीताबर्डी ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स किंवा झाशी राणी चौकापर्यंतच्या प्रवासासाठी केवळ 10 रुपये मोजावे लागतील. लोकमान्यनगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साउथ, एअरपोर्ट आणि जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी दर 30 रुपये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udhav thakare says, We will develop every city in Maharashtra