दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला डॅडी, मात्र शहरात पोहोचताच...

केतन पळसकर
गुरुवार, 11 जून 2020

तपासणीचे अहवाल येईपर्यंत त्याला कारागृहातील वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) 3 जून रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शरण आला. मात्र, गवळी मुंबई येथून आला असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला ताबडतोब प्रवेश न देता सर्वप्रथम त्याची कोरोनाची तपासणी केली, अशी माहिती त्याचे वकील ऍड. मीर नगमान अली यांनी दिली.

13 मार्च रोजी अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याने दोनचा पॅरोलसाठी अर्ज केला आणि रजा वाढवून घेतली. तिसऱ्यांदा मात्र न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून त्याला मुंबई येथील तळोजा कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले. परंतु, तळोजा कारागृहाने कोरोनाच्या भीतीमुळे गवळीला प्रवेश नाकारला.

वय वर्षे वीस, घरी बागायती शेती तरी केल्या तब्बल ३० चोऱ्या... वाचा ही अजब कहाणी

त्याने 29 मे रोजी चौथ्यांदा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करीत रजा वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याचे सततचे गाऱ्हाणे न एकता त्याला पाच दिवसांच्या आत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तो 3 जून रोजी कारागृहामध्ये शरण गेला. गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत 26 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मुंबई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने डॅडीला 20 मेपासून ते 2 जूनपर्यत क्वारंटाईन केले होते. त्यामुळे नागपुरात येताच त्याची मेडिकलमध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना तपासणीचे अहवाल येईपर्यंत त्याला कारागृहातील वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

 

खासगी गाडीने गाठले नागपूर

अरुण गवळी याने मुंबई ते नागपूर (मध्यवर्ती कारागृह) हा सुमारे 850 किमीचा प्रवास खासगी गाडीने पूर्ण केला. मुंबईच्या प्रशासनाकडे नागपूर प्रवासाची परवानगी त्याने घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका दिवसामध्ये त्याची परवानगी मंजूर करण्यात आली.

लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा

पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून 13 मार्च रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याला रजा वाढवून मिळाली. याचाच फायदा घेत तो सुमारे 2 महिने 20 दिवस कारागृहाच्या बाहेर होता. यादरम्यान, त्याची मुलगी योगिताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी साध्या पद्धतीने पार पडले. गवळीने यादरम्यान अनेकांना रेशन किट देत मदतसुद्धा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Underworld don Arun Gawli had to undergo corona test