माथ्यावरील पदवीचा डाग बाजूला ठेवून चहा विकून भरतात पोटाची खळगी

केवल जीवनतारे
गुरुवार, 30 जानेवारी 2020

कुहीपासून तर मांढळ, वेलतूर अशा तेरा ते पंधरा गावांतील पदवीधर युवकांच्या हाताला रोजगार नाही. चहाटपरीवर कॅरमच्या बोर्डवर "स्ट्रायकर'ला टोलवण्यात वेळ घालवणारी युवापिढी दिसते. तर दुसरीकडे माथ्यावरील पदवीचा डाग बाजूला ठेवून भाता चालवून चहा विकण्याचा व्यवसाय युवक करताना दिसतात.

नागपूर : आंभोरा हे विदर्भातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नव्हे तर पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेला तालुका. कधीकाळी पाच नद्यांचा संगम इथे होता. मासेमारी, पशुपालन, शेती अशा विविध व्यवसायांतून गावातील युवकांपासून साऱ्या बाया-माणसांच्या हाताला रोजगार होता. पण सारंकाही संपलं. आता मासेमारीवर संकट आलं. पशुपालन व्यवसाय बुडाला. माणसांच्या हाताला कामंच नाही. कुहीपासून तर मांढळ, वेलतूर अशा तेरा ते पंधरा गावांतील पदवीधर युवकांच्या हाताला रोजगार नाही. चहाटपरीवर कॅरमच्या बोर्डवर "स्ट्रायकर'ला टोलवण्यात वेळ घालवणारी युवापिढी दिसते. तर दुसरीकडे माथ्यावरील पदवीचा डाग बाजूला ठेवून भाता चालवून चहा विकण्याचा व्यवसाय युवक करताना दिसतात.

शासनाने डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतून आंभोरा पर्यटन क्षेत्राचा विकास केला तर युवापिढीला विकासाचा मार्ग गवसण्यास वेळ लागणार नाही. नागपूरपासून 80 किलोमीटरवर आंभोरा आहे. कुही, मांढळ, पाचगाव, डोंगरगाव, कुटी, वेलतूरमार्गे आंभोऱ्यातील नद्यांच्या संगमस्थळी पोहोचता येते. गोसेखुर्द प्रकल्पामुळे आंभोरा परिसरात तेरा गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यात गोंडपिपरी, धामणी, पिंपरी मुंजे, सिरसी, नवेगाव, सोनारवाई, आंभोरा, मालोदा, चिखली, गुनहा या गावांतील तेरा हजार लोकसंख्येच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न उभा ठाकला होता. या गावांत पदवीधर मुलांची संख्या दोन हजारांवर आहे. यातील 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पदवीधर. या गावातील प्रत्येक कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा ध्यास, आपल्या मुलाने मोठे व्हावे. त्यासाठी बापाने घाम गाळला. पोराला ग्रॅज्युएट केले. परंतु उच्च शिक्षणाची ऐपत वडिलात नाही. यामुळे नागपूर, मुंबईपर्यंत शिकायला गेलेले लेकरू परत आले. पदवी हातात घेऊन गावाकडे पोहोचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगार नसल्याने कोणी भाता चालवून "चहा' विकतो. तर कोणी रस्त्यावर कापड विकण्याचा व्यवसाय मांडतो. शिक्षण घेतलेल्या पदवीधर मुलाच्या हाती चहाची केटली बघून "बापा'ची मान खाली जाते. तर या भागातील चहाच्या टपरीवर कॅरम खेळून दिवस घालवतात. याची खंत या युवा पिढीला आहे, परंतु बॅंकेतून कोणी कर्ज देत नाही. यामुळे व्यवसाय उभारता येत नाही, ही या भागातील युवकांची खंत आहे.

सविस्तर वाचा - नागपुरच्या डॉनने लावली व्यापाऱ्याच्या डॉक्‍याला पिस्तुल...मग झाले असे

हा राहुल. आंभोरा पुनवर्सित गावात राहणारा. पदवीपर्यंत शिक्षण झालं. नोकरीसाठी प्रयत्न केले. पदवीनंतर पाच, सात हजारांची शहरात नोकरी मिळाली. परंतु सात हजारांत नागपूरसारख्या ठिकाणी भाड्याचं घर, वाहनाचा खर्च कसा करायचा. खायचं काय? आईवडिलांना मदत करायची कशी? अशा असंख्य प्रश्‍नांचे काहूर मनात उभे झाले. गावातून धनधान्य आणायचं आणि शहरात भाड्याच्या खोतील बसून खायचं, हे बुद्धीला पटले नाही, अखेर शहर सोडून राहुल गावात आला. काकाच्या चहाटपरीवर बसतो. गावखेड्यातून आणलेलं गाठोडं पाठीवर मांडून गाव जवळ करणाऱ्या युवकांच्या संख्येने गाव पुन्हा फुलू लागले. गाव युवकांच्या संख्येने गजबजले. जंगलाच्या कुशीतील गावांत सर्वच शेतकरी अल्पभूधारक अन्‌ शेतमजुरीवर जगतात.

मात्र विस्थपित झाल्याने या गावांपर्यंत केंद्र शासनाची कौशल्य विकास योजना पोहोचलीच नाही. गावाच्या बाजूला उमरेड-कऱ्हांडला, पवनी अशा व्याघ्र प्रकल्पांसह पाच नद्यांचा संगम होता. परंतु येथील पाचही नद्यांच्या धारा थांबल्या. व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती वाढली, परंतु या पुनर्वसित मोठ्या आंभोऱ्यापर्यंत पर्यटन पुन्हा एकदा नव्याने पोहोचवण्याची गरज आहे. आंभोरा परिसरातील दोन हजारांवर बेरोजगार युवकांच्या हाताला कामाची गरज आहे. या भागातील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा विकास साधून सहज पर्यायी रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतो. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेतून या भागातील युवकांना "गाइड' तसेच इतर व्यवसायात कौशल्याचे प्रशिक्षण प्रभावीपणे राबवल्यास आंभोरा परिसरातील पदवीधरांसाठी अच्छे दिन येण्यास उशीर लागणार नाही.

डोंगा थांबला, डोंगुली बंद पडली
आंभोऱ्याला महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. भंडारा मार्गे रावणवाडी (पर्यटन क्षेत्र) आंभोऱ्याचा देवस्थान प्रवास अतिशय आनंददायी ठरू शकतो. भंडारामार्गे मंदिरापर्यंत पोहोचायला नदी ओलांडून जावे जागते. त्यासाठी येथे होड्या अर्थात डोंगा यातून प्रवास करावा लागतो. होड्यांचा हा प्रवास अविस्मरणीय अनुभव देणारा होता. परंतु कधीकाळी गतीने वाहणारा डोंगा आता थांबला. यामुळे हा व्यवसाय बंद पडला. आंभोऱ्यातील टेकड्या म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत आहेत. वैनगंगा, आंब, मुर्जा, कन्हान, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर अंभोरा आहे. परंतु नदीच्या वाहत्या धारांना रोखल्याने डोंगुलीतून मासेमारी करणारे "हात' डोंगुलीपासून दूर झाले. महादेवाचे नाव चैतन्येश्‍वर असल्याने येथे पोहोचताच चैतन्य ठासून भरल्याचा अनुभव मिळत होता. परंतु आता सारे ओसाड चित्र दिसते. मराठीचे आद्यकवी श्री. मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे, असे सांगितले जाते. महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. या भागात नेपाळच्या राजाच्या मुलाची समाधी आहे, असे सांगण्यात येते. रणरणत्या उन्हाळ्यात ज्येष्ठ शुद्ध दशमीला नदीचे पात्र विस्तारत होते, परंतु आता या गावातील युवकांच्या हाताला काम नसल्याने आमच्या रोजगाराचे काय? हा एकच सवाल यांचा आहे. पाच नद्यांचा संगम असलेल्या अंभोऱ्याच्या पर्वतामधून कधीकाळी पाच धारा खाली कोसळत असल्याचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी पयर्टकांची गर्दी होत असे. पहाडात जुन्या किल्ल्यांचे अवशेष बघायला मिळत होते, किल्ल्यातून दूर पसरलेली कौलारू घरांची खेडी दिसायची, परंतु हा निसर्ग आता केवळ कागदी चिटोऱ्यावर आहे.

रोजगारासाठी योजना राबविण्याची गरज
आंभोऱ्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. मंदिर परिसरातच भक्तांसाठी राहण्याची सोय करण्यात आली होती. खानावळी निर्माण करण्यापासून तर निवासाची सोय करता येते. इथल्या शांत निसर्ग आणि नद्यांच्या संगमांना वाट मोकळी करून देण्याचा मार्ग शोधावा. पर्यटनाचा विकास करताना युवकांच्या हाताला काम देण्यासाठी योजना राबवण्याची गरज आहे. गोसेच्या विस्थापितांना नोकरी द्यावी. या भागातील ओसाड वातावरणातून पुन्हा एकदा आंभोरा पर्यटनाच्या माध्यमातून फुलविला तर रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतील, त्यांच्या हाताला काम मिळेल त्या दिवशीच या भागातील युवक आत्मनिर्भर होतील, हे मात्र निश्‍चित.
-विलास भोंगाडे, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, नागपूर.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployment is a big question in Ambhora