
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक व्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी व त्याला उभारणी देण्यासाठी, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, कृषीक्षेत्र, स्टार्टअप इत्यादीवर अर्थसंकल्पात भर दिलेला दिसतो. आरोग्यसेवेतील पायाभूत साधन सुविधांसाठी रू.२.२३ लक्ष कोटीची भरीव तरतूद यंदा केलेली आहे. त्यात कोरोना लसीकरणासाठी ३५,४०० कोटी रुपयांची तरतूद आहे.
नागपूर: अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाकडून देशातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना काहीसा दिलासा सरकार देईल असं सर्वांनाच वाटतं होतं. मात्र सामान्य नागरिकांच्या कुठल्याही अपेक्षा सरकारकडून मांडण्यात आल्या नाहीत असं मत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डाॅ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आर्थिक व्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी व त्याला उभारणी देण्यासाठी, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, कृषीक्षेत्र, स्टार्टअप इत्यादीवर अर्थसंकल्पात भर दिलेला दिसतो. आरोग्यसेवेतील पायाभूत साधन सुविधांसाठी रू.२.२३ लक्ष कोटीची भरीव तरतूद यंदा केलेली आहे. त्यात कोरोना लसीकरणासाठी ३५,४०० कोटी रुपयांची तरतूद आहे.
पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, रेल्वे मेट्रो, सार्वजनिक वाहतूक इत्यादीवर भरीव तरतूदीमुळे रोजगार निर्मितीमध्ये निश्चितपणे वाढ अपेक्षितआहे. त्यात महाराष्ट्रात, नागपूर मेट्रो-2 साठी ५ हजार ९७६ कोटी रुपये व नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी रुपयेची तरतूद निश्चितपणे स्वागतार्थ आहे असं ते म्हणाले.
ज्या राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणूक आहेत त्यांना रस्त्यांचे गिफ्ट मुक्त हस्ते देण्यात आले आहे. त्यातून अर्थसंकल्पात राजकीय दृष्टिकोन डोकावतो. कोरोनामुळे पर्यटन व हॉटेल व्यवसाय यांचे कंबरडे मोडले होते परंतु त्यांना कोणताच दिलासा या अर्थसंकल्पात दिसत नाही. ऊर्जाक्षेत्रात ग्राहकांना वीज घेण्यासाठी वीज कंपनी चा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना, ऊर्जाक्षेत्रात, चांगल्या सेवा सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे असं मत खडक्कार यांचं आहे.
कोरोनामुळे, मध्यमवर्गीयांना आर्थिक परिस्थिती झुंजताना नाकी नऊ आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात, आयकरात, ८० सी अंतर्गत मिळणारी वजावटीची मर्यादा, स्थायी वजावटीची मर्यादा व ८०-डी अन्वयेची कमाल मर्यादा वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु या अर्थसंकल्पाने त्यांची घोर निराशा केली आहे. करप्रणाली मध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे कोणताच दिलासा मध्यमवर्गीयांना मिळाला नाही असंही ते म्हणाले.
जाणून घ्या - लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करणार 'इंटर मॉडेल हब'; नितीन गडकरींची मोठी घोषणा
एकंदरीत, कोरोनाशी झुंजताना,सर्वांनाच दिलासा देणे अर्थमंत्र्यांना कठीण होते, त्यामुळे देशाच्या विकासाची बांधणी करणारा हा अर्थसंकल्प असे याचे वर्णन करता येईल.
डाॅ. संजय खडक्कार
माजी तज्ज्ञ सदस्य,
विदर्भ वैधानिक विकास मंडळ
संपादन - अथर्व महांकाळ