केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, स्वतः ट्विट करून दिली माहिती

राजेश रामपूरकर
Wednesday, 16 September 2020

यापूर्वी क्रीडा मंत्री सुनील केदार हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय पालकमंत्री नितीन राऊत व गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित आढळले होते. महापौर संदीप जोशी यांनी स्वतःला विलगीकरण करून घेतले होते.

नागपूर  ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ही माहिती त्यांनी स्वतः ट्व्टिट करून दिली. मंगळवारी मला थकवा जाणवत होता. मी माझ्या डॉक्टरला संपर्क साधला. त्यानंतर मी कोरोनाची तपासणी केली. त्यात माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मला आता बरे वाटत असून स्वतःहून विलगीकरणात ठेवले आहे. जे माझ्या संपर्कात आलेले असतील त्यांनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यापूर्वी क्रीडा मंत्री सुनील केदार हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय पालकमंत्री नितीन राऊत व गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित आढळले होते. महापौर संदीप जोशी यांनी स्वतःला विलगीकरण करून घेतले होते. दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असून कोरोनाच्या संसर्गामुळे दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रातील अनेक मंत्री, देशभरातील खासदारांना कोरोनाचा लागण झालेली आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 

नागपुरात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कोरोनाचे संकट तीव्र झाले आहे. बुधवारी (ता.१६) नागपुरात ६० जणांचा बळी गेला. तर नव्याने २०५० बाधितांची भर पडली. यामुळे बाधितांचा आकडा ५७ हजार ४८२ वर पोहोचला आहे. तर मृत्यूचा आकडा १८१५ झाला आहे.

सहा महिन्यांपासून नागपुरात असलेले कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूंसह बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मागील २४ तासांमध्ये मेयो रुग्णालयात ३८ तर मेडिकलमध्ये १९ जण दगावले आहेत. सोळा दिवसांमध्ये कोरोनाने ७६३ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष असे की, सारीचे निदान झालेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा होत असून यातच त्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या २०५० बाधितांपैकी १६२६ जण शहरातील तर ग्रामीण भागातील ४१७ जण आहेत. नागपुरात खासगी प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर आरटी पीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. बुधवारी नागपुरात ८ हजार ३४० चाचण्या करण्यात आल्या. 

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत
 

यातील १६६५ चाचण्या खासगी प्रयोगशाळेतील असून ६०६ जणांना बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. एम्समध्ये केवळ १०१ चाचण्या झाल्या असून, यातील ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मेडिकलमध्ये ६८५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून यातील २६२ जण बाधित आढळून आले. मेयोतील प्रयोगशाळेत ६९० चाचण्या करण्यात आल्या. यातील १५५ जण बाधित आढळले. निरी प्रयोगशाळेतून २४५ चाचण्यांमधून २६ जण बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे.

माफ्सुत १०० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह

पशुवैद्यकीय विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रयोगशाळेत बुधवारी १४३ जणांनी चाचणी करण्यात आली. या सर्वच अहवाल पॉझिटिव्ह आले. मागील सहा महिन्यांत पहिल्यांदाच एखाद्या प्रयोगशाळेत १०० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शहरातील महापालिकेच्या केंद्रात झालेल्या ४८११ अँटिजेन रॅपिड टेस्टमधून ८०४ जणांना बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

जिल्ह्यात ११ हजार ७४० सक्रिय रुग्ण

सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ७४० वर पोहोचली आहे. यातील मेयो, मेडिकल, एम्स आणि लता मंगेशकर रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ५ हजार ५७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६ हजार १४३ बाधित रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. बुधवारी १५९४ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ४३ हजार ९५२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Nitin Gadkari corona positive