जुलै महिन्यात खरोखरच परीक्षा होईल काय? मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतरही प्रश्‍न कायम...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वच अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद साधला. बैठकीत त्यांनी कोरोनामुळे बदललेल्या शिक्षणपद्धतीचा आढावा घेतला. त्यामध्ये सध्याची कोरोनाची परिस्थिती बघता, जुलै महिन्यात खरोखरच परीक्षा होईल काय? याबाबत शाशंकता व्यक्त केली. तसेच राज्य सरकार कोणत्याही विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्‍यात टाकणार नाही असे स्पष्ट केले. याशिवाय येत्या काळात शिक्षणाचे आयाम बदलणार असून, त्यानुसार शिक्षकांनी नवी शिक्षणपद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहन केले.

नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही उच्च शिक्षण विभागाकडून ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात परीक्षा घेण्याबाबत अनिश्‍चितता दर्शविल्याने आता विद्यापीठांनी परीक्षांसंदर्भात "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयस्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वच अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद साधला. बैठकीत त्यांनी कोरोनामुळे बदललेल्या शिक्षणपद्धतीचा आढावा घेतला. त्यामध्ये सध्याची कोरोनाची परिस्थिती बघता, जुलै महिन्यात खरोखरच परीक्षा होईल काय? याबाबत शाशंकता व्यक्त केली. तसेच राज्य सरकार कोणत्याही विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्‍यात टाकणार नाही असे स्पष्ट केले. याशिवाय येत्या काळात शिक्षणाचे आयाम बदलणार असून, त्यानुसार शिक्षकांनी नवी शिक्षणपद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहन केले.

यावेळी सरकार एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सूचोवाच त्यांनी केले. मात्र, परिपत्रकानुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी जुलै महिन्यात परीक्षा होत असल्याने अभ्यासाला लागले आहे. अशावेळी पुन्हा अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाल्याने विद्यार्थी प्लेसमेंट आणि अभ्यासाबाबत काहीही दिशा ठरवू शकत नसल्याचे दिसून येत आहेत.

Video : कुटुंबापेक्षा गावाचे हित जपणाऱ्या या बापानेच पत्नी आणि मुलीला ठेवले संस्थात्मक विलगीकरणात

प्रात्यक्षिक परीक्षाही होल्डवर

दुसरीकडे विद्यापीठाकडूनही याबाबत बरीच तयारी करण्यात आलेली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 1 ते 31 जुलैदरम्यान अंतिम वर्षातील (4,6,8,10 सेमिस्टर) परीक्षा 13 मार्चच्या अभ्यासक्रमावर आधारित महाविद्यालयस्तरावर घेण्याचे ठरविले आहे. यासाठी तयारी पार पडली आहे. त्यापूर्वी बॅकलॉगच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. यासाठी 50 गुणांचा दोन तासाचा पेपर घ्यायचा असून, जुन्या सेमिस्टरमधील गुणांकन करताना त्याला दुप्पट करण्यात येईल. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सर्वच विद्यापीठांनी या परीक्षाही होल्डवर ठेवल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University's 'Wait and Watch' after CM's meeting