esakal | व्हिडिओ : एका अवलिया युवकाच्या संघर्षाचा असा झाला `चिखल'...कुणीच दाद देईना
sakal

बोलून बातमी शोधा

In vain struggle of a socially committed youth, no one responding

ही कथा आहे एका अवलिया युवकाची. घरादाराकडे दुर्लक्ष करून सतत रस्त्यावर उतरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची. मोईज खान त्याचं नाव. त्याला जग बदलवायचं नाही. परंतु, लोक सुखी होतील. लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. चोवीस तास वीज मिळेल. गरीबांची मुलं ज्या सरकारी शाळेत जातात, तिथं त्यांना उत्तम शिक्षण मिळेल. ही भाबडी आशा बाळगून तो सतत भिंगरीसारखा फिरत असतो. कधी आशिनगर झोन, कधी मंगळवारी झोन, कधी सतरंजीपुरा झोन कार्यालयात चपला झिजवत असतो. नगरसेवांच्या भेटी घे, अधिकाऱ्यांना निवेदन दे. महापौरांना भेट. काहीही केल्या लोकांच्या समस्या सुटाव्यात. त्यांचे जगणे सुकर व्हावे. हाच त्याचा हेतू. परंतु त्याच्या या संघर्षाचा अगदी "चिखल' करुन टाकलाय. वाचा कसा...?

व्हिडिओ : एका अवलिया युवकाच्या संघर्षाचा असा झाला `चिखल'...कुणीच दाद देईना

sakal_logo
By
प्रमोद काळबांडे

नागपूर : नागपूर नगरी म्हणजे "स्मार्ट सिटी', असा गाजावाजाही केला जातो आणि बाहेरून येणाऱ्यांना प्रथमदर्शनी तसे दिसतेही. नागपूर शहरातील काही भाग उदाहरणार्थ, सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ असतीलही स्मार्ट. चकचकीत. परंतु, नागपूर शहरातील असे काही भाग आहेत, जे नागपूर शहरातील वाटणारच नाहीत. मोईज खान ज्या भागातील समस्येसाठी भांडत आहे, त्या भागाचे नावच "श्रीकृष्ण धाम झोपडपट्टी' आहे. झोपडपट्टी म्हटले की, डोळ्यापुढे गलिच्छ वस्ती डोळ्यासमोर येते. ही अशीच एक झोपडपट्टी आहे. परंतु ही झोपडपट्टी आणखी गलिच्छ करण्याचे काम स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केले आहे. काय केले त्यांनी...

नागपूर शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टी वसाहती आहेत. नागपूर शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या झोपडपट्टीत राहते, हे सांगितले तर नागपूर बाहेरच्या लोकांचा कदाचित विश्‍वासच बसणार नाही. अशीच एक झोपटपट्टी वसाहत "श्रीकृष्ण धाम झोपटपट्टी'. तब्बल अडीच हजार एवढी लोकसंख्या. म्हणजे एकूण चारशे घरे इथे आहेत. आजवर या झोपडपट्टीत घरोघरी नळ नव्हते. "24 बाय 7' अर्थात फुलटाइम पाणी देण्याचा नागपूर प्रशासनाचा दावा किती फोल होता, हे या झोपडपट्टीतील स्थितीवरून लक्षात येते. तर झाले असे...

अधिक वाचा - मुंढे साहेबऽऽ, सातशे जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ कोणामुळे आली? आता माफी मागा...

"अमृत'च्या कामामुळे झाली सर्कस

सरकारने एक "अमृत' नावाची योजना आणली. या योजनेतून शहरात विकासकामे केली जातात. यातून श्रीकृष्ण धाम झोपडपट्टीतमध्ये घरोघरी नळ देण्याचे काम सुरू केले. या झोपडपट्टीत "एन्ट्री' करणारा जो मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले. ही पाचएक महिन्याच्या आधीची गोष्ट. रस्ते खोदले, मात्र काम अपूर्ण राहिले. या खोदकामामुळे आणि रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे या रस्त्याचे दृश्‍यच बदलले. आता पाऊसही आला. आता या रस्त्यावरून जाणे म्हणजे जणू सर्कस झाले आहे...

20 आमदारांच्या घरापुढील रस्ते कसे चकाचक?

श्रीकृष्ण धाम झोपडपट्टीत "एन्ट्री' करणारा हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. नागपूर शहरात जवळपास 20 आमदार राहतात. यापैकी सर्वच आमदारांच्या घराकडे जाणारे रस्ते चर चकचकीत असू शकतात. तर मग श्रीकष्ण धाम झोपडपट्टीतील अडीच-तीन हजार लोकांच्या घराकडे जाणारा एक रस्ता चिखलाने तुडूंब भरलेला का राहू शकतो? मोईज खानचा असा आरोपच आहे. हे खरेही आहे. बड्या लोकप्रतिनिधींची काळजी जर मनपा प्रशासन तातडीने घेत असेल, तर मग या अडीच हजार लोसंख्येचा विचार का केला जात नाही?

हेही वाचा - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

भेटी लागी जीवा...सर्वच नगरसेवकांना भेटून झाले

या अडीच हजार लोकसंख्येचा हा प्रश्‍न मोईज खान यांना सतत सलत होता. त्याने निवेदन केले. महानरपालिकेच्या मंगळवारी झोनच्या सहायक आयुक्तांना भेटला. या झोपडपट्टीचा समावेश प्रभाग 11 मध्ये आहे. या प्रभागाचे नगरसेवक संगिताताई गिऱ्हे, अर्चना पाठक, संदीप जाधव आणि भूषण शिंगणे यांना भेटला. निवदेन दिली. त्यानंतर झोन सभापती गार्गी चोपडा यांनाही तो भेटला. एवढेच नव्हे तर महापौरांना भेटल्याचेही त्याने सांगितले. परंतु चिखलावर कुणालाही तोडगा काढता आला नाही. या प्रश्‍नी झोपडपट्टीतील चित्रा साखरे, पूजा ऍन्थोनी, मनीषा यादव, मीनाक्षी सहारे, झाडे यादव हेही प्रशासनाच्या मागे लागून आहेत.

तारीख पे तारीख! पर देखते है...

"सकाळ' प्रतिनिधीने नगरसेविका संगिता गिऱ्हे आणि मोईज खान यांचा थेट "कॉन्फरन्स कॉल'मध्ये संवाद घडवून आणला. गिऱ्हे मॅडम म्हणाल्या, ""रस्त्याचे खोदकाम सुरू होते, हे खरे आहे. होळीच्या सुट्यांसाठी मजूर घरी गेले आणि अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. त्यामुळे काम थांबले. या प्रश्‍नावर तेथील लोकांसोबत मी बोलले आहे. त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली आहे.'' याच "कॉन्फरन्स कॉल'मध्ये मोईज खानच्या समक्ष संगिता गिऱ्हे यांनी 15 जुलै ही पुन्हा काम सुरू करण्याची तारीख दिली. त्यावर मोईज म्हणाला, "सर, इसके पह्यले 11 तारीख दी थी. तारीख पे तारीख है. पर देखते है.''