44 वर्षांपूर्वी व्हीसीएवर रंगला होता "तेलंग शो' 

विजय तेलंग
विजय तेलंग

नागपूर  : घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले विदर्भाचे विजय तेलंग यांची फटकेबाजी प्रत्यक्ष मैदानावर बघताना कमालीचा आनंद मिळायचा. क्रिकेटप्रेमींसाठी ती एकप्रकारे मेजवानी असत. तेलंग यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आक्रमक डाव खेळून विदर्भाला विजय मिळवून दिलेत. परंतु, 44 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध ठोकलेली "सेंच्युरी' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सध्या हयात नसलेले तेलंग यांनी दुसऱ्या डावात 117 धावा फटकावून उत्तर प्रदेशच्या आशेवर पाणी फेरले. पहिल्या डावात 177 धावांनी मागे पडूनही विदर्भाने त्या लढतीत सर्वाधिक गुणांची कमाई केली होती, हे उल्लेखनीय. 


1976 मध्ये 18 ते 20 डिसेंबरदरम्यान व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावरील तो तीनदिवसीय रणजी सामना खऱ्या अर्थाने "तेलंग शो' म्हणून क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहिला. त्या सामन्यात विदर्भाचे नेतृत्व इम्रान अलींनी केले होते, तर उत्तर प्रदेशची धुरा महंमद शाहिद यांच्याकडे होती. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाचा डाव चहापानापूर्वीच 158 धावांत गडगडला. शुक्‍ला (पाच बळी) यांच्या अचूक माऱ्यापुढे सलामीवीर तेलंग (63 धावा) व प्रकाश सहस्रबुद्धे (नाबाद 30 धावा) यांचा अपवाद वगळता विदर्भाचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. प्रत्युत्तरात सलामीवीर विजय चोप्रांच्या (121 धावा) शतकी तडाख्याच्या जोरावर उत्तर प्रदेशने 335 धावा काढून पहिल्या डावात 177 धावांची भक्‍कम आघाडी घेतली. मार्कंड यांचे पाच बळीही उत्तर प्रदेशच्या धावगतीवर नियंत्रण ठेवू शकले नाही. 


पहिल्या डावात पावणेदोनशे धावांनी मागे पडल्यानंतर विदर्भावर घरच्याच मैदानावर डावाने पराभवाचे सावट पसरले होते. त्यामुळे विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये काहीशी निराशा पसरली होती. परंतु, तेलंग यांनी संघावर नामुष्कीची वेळ येऊ दिली नाही. त्यांनी "वनडे स्टाइल' जोरदार फटकेबाजी करीत 117 धावा ठोकून डावाने पराभवाचे संकट दूर केले. विदर्भाला 291 धावांपर्यंत पोहोचविण्यात नजबिले यांच्याही 68 धावा मोलाच्या ठरल्या. शुक्‍ला यांनी दुसऱ्याही डावात सर्वाधिक सहा बळी टिपले. 

उत्तर प्रदेशचा विजय थोडक्‍यात हुकला 


उत्तर प्रदेशला निर्णायक विजयासाठी 16 षटकांत 115 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रतिषटक सात धावांचे विजयी लक्ष्य त्या काळात जरा कठीणच होते. तरीही अधिक गुणांच्या लोभापायी उत्तर प्रदेशने ती "रिस्क' घेतली. त्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही मिळाले. दुर्दैवाने षटके संपल्याने उत्तर प्रदेशचा विजय अवघ्या 17 धावांनी हुकला. अब्दुल हाई यांनी नाबाद 40 व अष्टपैलू शुक्‍ला यांनी 35 धावा काढून वैदर्भी खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळविले होते. सामना अनिर्णीत सुटला तेव्हा उत्तर प्रदेशची दुसऱ्या डावात 5 बाद 98 अशी धावसंख्या होती. पहिल्या दिवसापासून सामन्यावर वर्चस्व गाजवूनही उत्तर प्रदेशला केवळ तीन गुणांवर समाधान मानावे लागले. विदर्भाच्या पारड्यात सर्वाधिक पाच गुण पडले. सामन्याचे साक्षीदार ठरलेले विदर्भाचे सुहास फडकर यांनीही त्या लढतीला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक संबोधले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com