पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाज्यांची चव चाखलीत का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

विदर्भातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थानिक बाजारपेठेत भारंगी, टाकळा, फोडशी, पोकळा, करटोली, केनी, कवला, मायाळू, या भाज्या हमखास हजर झाल्या आहेत. तरूण पिढीला या पालेभाज्यांबद्दल फारशी माहिती नसल्याने हा गावरान मेवा दुर्लक्षित राहतो.

नागपूर : पावसाळ्याच्या प्रारंभी भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असताना जिल्हाच्या ग्रामीण भागातील बाजारपेठेत मोठया प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्या आहेत. या रानभाज्या आरोग्यवर्धकही असतात. रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासींच्या संसाराचा गाडा हाकला जात असतो.

विदर्भातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थानिक बाजारपेठेत भारंगी, टाकळा, फोडशी, पोकळा, करटोली, केनी, कवला, मायाळू, या भाज्या हमखास हजर झाल्या आहेत. तरूण पिढीला या पालेभाज्यांबद्दल फारशी माहिती नसल्याने हा गावरान मेवा दुर्लक्षित राहतो. जिल्हाच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या गावरान मेव्याने जागा घेतली आहे. ग्रामीण भागात त्यांचा स्वादही चाखून झाला असला तरी शहरी भागात त्या भाज्या कशा बनवाव्यात याबद्दल फारशी माहिती नसल्याने हा आरोग्यवर्धक रानमेवा दुर्लक्षित राहतो .

विशिष्ट मोसमात उपलब्ध होणारी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आहारशास्त्र सांगते. त्यामुळे या भाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. पावसाळ्यात भाज्यांचा तुटवडा असताना केवळ फ्लॉवर, कोबी, बटाटे, सिमला मिरची, तोंडली, चवळी, कारली आदी भाज्या येत असल्या तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो त्यामुळे अशा भाज्या आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. तर दुसरीकडे सेंद्रीय भाज्यांचे गगनाला भिडलेले असतात.
रानभाज्या डोंगर उतार, झुडूपांमध्ये वा स्वच्छ माळरानात असतात.
रानभाज्या निसर्गाच्या वातावरणात तयार होत असल्याने आरोग्याला फलदायी ठरतात.

 •  रानभाज्यांची खास शेती करावी लागत नाही या सर्वच भाज्या अगदी वाफेत तयार होतात.
 •  केवळ कांदा व मिरचीची फोडणी देऊनही या भाज्या तयार करता येत असल्याने आर्थिकदृष्टया त्या परवडणाऱ्या आहेत.
 •  पावसाळयात पोटाच्या विकारावर गुणकारी औषध म्हणून वाळ घालून केलेली भारंगीची भाजी, फोडशीची भाजी तर कांद्याची पातीची भाजी जशी करतात, त्याच प्रकारे करता येते.
 •  तुरीची डाळ घालून केलेली टाकळयाची भाजी पोटातील कृमींवर गुणकारी असते.
 •  कवळयाची भाजी कांद्यांची फोडणी देऊन अतिशय चविष्ट लागते.
 •  कवळा हा कफावर गुणकारी असल्याने ग्रामीण भागात अजूनही त्या भाजीचा औषध म्हणून वापर करतात
 •  शहरी भागात लोकप्रिय असलेली करंटोळीची भाजी ही स्वादिष्ट व हदयरोगावर उपयुक्त ठरत असल्याने तिला चांगलीच मागणी आहे.
 • संधीवात, मधुमेह व पोटाचे विकार यांवर या लाभदायक ठरत असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञांचे मत आहे.

सविस्तर वाचा - नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळणार?

विषारी-बिनविषारी
रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्‍यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.
पौष्टिक गुणधर्म

 •  ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते.
 •  करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात.
 •  आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते.

रानभाज्यांसाठी रानोमाळ भटकंती
पावसाच्या आगमनाबरोबर या डोंगराळ भागात रानभाज्या दिसायला लागतात. टाकळा, भारंगा, कुडा, शेवळा आदी रानभाज्या सध्या विक्रीसाठी येत आहेत. तर थोड्याच दिवसात तयार झाल्यावर भोवरीची व आळूची पाने, करटोळी यासह अन्य भाज्या विक्रीसाठी आणल्या जातील. बेसुमार होत चाललेली जंगलतोड, जंगलात लावले जाणारे वणवे यामुळे रानभाज्या शोधण्यासाठी खूप वेळ जातो. घरची मुले व पुरुष रानोमाळ भटकून रानभाज्या गोळा करतात. तर आम्ही बाजारात त्यांची विक्री करतो.
पार्वती वाळवी, विक्रेता महिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables in rainy season