विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा

नरेंद्र चोरे
बुधवार, 10 जून 2020

74 धावांची आघाडी विदर्भासाठी खूप मोठी होती. पण, विदर्भाला केवळ आघाडीवर समाधान मानायचे नव्हते. निर्णायक विजय मिळवून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा संघाचा प्रयत्न होता. त्यामुळे दुसऱ्या डावात वेगाने धावा काढून राजस्थानला कोंडीत पकडण्याच्या इराद्याने वैदर्भी फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले.

नागपूर : एखाद्या बलाढ्य संघाला त्यांच्या मैदानावर पराभूत करण्याचा आनंद निश्‍चितच मोठा असतो. असाच एक पराक्रम 29 वर्षांपूर्वी कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात विदर्भ रणजी संघाने राजस्थानविरुद्ध बिकानेरमध्ये केला होता. यजमान राजस्थानला चारदिवसांच्या रणजी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाचा निर्णायक विजय थोडक्‍यात हुकला, मात्र राजस्थानला ते अपयश चांगलेच जिव्हारी लागले. 

डिसेंबर 1991 मध्ये खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात राजस्थानकडून कर्णधार परमिंदर सिंगशिवाय गगन खोडा, के. झुल्फीखार अली, अस्लम बेग, आर. एस. राठोड, युनूस अली, विलाज जोशी व हरीश जोशीसारखे मातब्बर खेळाडू होते, तर विदर्भ संघात कर्णधार हिंगणीकर, अनिरुद्ध सरवटे, योगेश घारे, समीर गुजर, प्रल्हाद रावत, उस्मान गनी, प्रशांत वैद्य, प्रीतम गंधे, राजेश गावंडेचा समावेश होता. खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करणे अवघड असल्यामुळे नाणेफेक जिंकणे आवश्‍यक होते. सुदैवाने त्यात विदर्भ यशस्वी ठरला आणि क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या धक्‍क्‍यानंतर स्वत:ला सावरत विदर्भाने 312 अशी धावसंख्या उभारली. विदर्भाच्या धावसंख्येत रावत (नाबाद 79 धावा), गनी (58 धावा), घारे (52 धावा) व कर्णधार हिंगणीकर(49 धावा) यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. 

हेही वाचा  : *50 वर्षांपूर्वी "टेलेंडर्स'नी राखली होती विदर्भ रणजी संघाची लाज!*

प्रत्युत्तरात विदर्भाच्या प्रशांत वैद्य व राजेश गावंडे यांनी तुफान मारा करत यजमानांची तासाभरातच दाणादाण उडविली. वैद्य-गावंडे जोडीने प्रत्येकी तीन गडी बाद करून राजस्थानच्या वरच्या फळीला खिंडार पाडले. 4 बाद 65 या दयनीय स्थितीतून राजस्थान संघ शेवटपर्यंत सावरला नाही आणि अख्खी टीम 238 धावांत गारद झाली. 74 धावांची आघाडी विदर्भासाठी खूप मोठी होती. पण, विदर्भाला केवळ आघाडीवर समाधान मानायचे नव्हते. निर्णायक विजय मिळवून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा संघाचा प्रयत्न होता. त्यामुळे दुसऱ्या डावात वेगाने धावा काढून राजस्थानला कोंडीत पकडण्याच्या इराद्याने वैदर्भी फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सलामीवीर सरवटे (63 धावा) व घारेंच्या (72) अर्धशतकानंतर गुजर यांच्या तडाखेबंद 98 धावांच्या जोरावर विदर्भाने दुसरा डाव 4 बाद 297 धावांवर घोषित करून राजस्थानपुढे 372 धावांचे लक्ष्य ठेवले. 

...आणि विजय थोडक्‍यात हुकला 
चौथ्या दिवशी चौथ्या डावात पावणेचारशे धावांचे आव्हान पेलण्यापेक्षा केवळ "डिफेन्सिव्ह अप्रोच' ठेवत शेवटचा दिवस खेळून मानहानी टाळणे एवढेच राजस्थानच्या हाती होते. याउलट विदर्भाने मात्र निर्णायक विजयासाठी प्रयत्न सुरू ठेवले. यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यशही आले. दुर्दैवाने विलास जोशी (नाबाद 77 धावा) व ए. के. सिन्हा (61 धावा) यांच्या चिवट फलंदाजीमुळे विदर्भाचा विजय थोडक्‍यात हुकला. सामना अनिर्णीत संपला तेव्हा राजस्थानच्या 8 बाद 210 धावा फळ्यावर लागल्या होत्या. प्रीतम गंधे यांनी सर्वाधिक पाच व गावंडे यांनी तीन गडी बाद करून संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विदर्भाचा निर्णायक विजय अवश्‍य हुकला, पण पहिल्या डावाच्या आघाडीवर सामना जिंकल्याचे खेळाडूंना मानसिक समाधानही होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha had missed win against Rajasthan 29 years ago