esakal | विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा

बोलून बातमी शोधा

file photo

विदर्भाला निर्णायक विजयासाठी 128 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. मात्र, खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता, चौथ्या डावात हे आव्हान सहजसोपे नव्हते. मध्य प्रदेशचे गोलंदाज गायकवाड यांनी लागोपाठ तीन गडी बाद करून एकप्रकारे विदर्भाला धोक्‍याचा इशाराच देऊन टाकला होता. सामना हातून निसटतो की काय असे वाटू लागले होते. त्यामुळे साहजिकच नैराश्‍याचे वातावरण होते. मात्र, सलामीवीर गोसावी यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही.

विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर  : कोणत्याही संघासाठी पहिला निर्णायक विजय नेहमीच अविस्मरणीय असतो. आणि तो विजय जर घरच्या मैदानावर मिळविला असेल तर, त्याची मजा औरच असते. असाच एक विजय विदर्भ रणजी संघाने 61 वर्षांपूर्वी छल्ला नरसिंहन यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशविरुद्ध व्हीसीए मैदानावर मिळविला होता. त्या सामन्यात वैदर्भी क्रिकेटपटूंनी दाखविलेली एकजूटता सहा दशके लोटूनही आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहे. 


1959-60 च्या मोसमात 4 ते 6 डिसेंबर या काळात खेळल्या गेलेल्या तीनदिवसीय सामन्यात विदर्भाकडून कर्णधार छल्ला नरसिंहनशिवाय डी. डी. देशपांडे, एम. के. जोशी, एस. ए. रहिम, व्ही. डी. गोसावी, एस. के. साहू, ए. एन. अभ्यंकर, के. व्ही. गिजरे, यु. कुमरे, एस. गणोरकर, एन. बोकेसारखे रथीमहारथी होते. तर, सी. सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात सी. ए. नायडू, पी. सी. ब्रम्हो, एम. आर. शर्मा, एच. दळवी, एल. टी. सब्बू, एस. बॅनर्जी, एम. रवींद्र, एस. गायकवाड, ए. एस. भगवानदास व एल. श्‍यामलाल हे त्या काळातील नावाजलेले फलंदाज व गोलंदाज होते. गोलंदाजांसाठी अनुकूल ठरलेल्या खेळपट्‌टीवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. पाहुण्या संघाचा डाव पहिल्याच दिवशी अवघ्या 186 धावांत गुंडाळला. मध्य प्रदेशकडून एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही, हे उल्लेखनीय. सर्वाधिक नाबाद 38 धावा रवींद्र यांनी काढल्या. विदर्भाकडून रहिम यांनी पाच गडी बाद करून खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजविला. तीन बळी टिपून गणोरकर यांनी त्यांना उत्तम साथ दिली. 

हेही वाचा  : विंडीजच्या तोफखान्याविरुद्‌ध एकटेच लढले होते विदर्भाचे मुर्तीराजन
 


मध्य प्रदेशला कमी धावांमध्ये गुंडाळल्या आनंद वैदर्भी खेळाडूंच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर विदर्भाचाही डाव केवळ 190 धावांत आटोपला. मात्र, चार धावांची निसटती आघाडी घेतल्याचे त्यांना निश्‍चितच समाधान होते. विदर्भाला आघाडी मिळवून देण्यात स्वत: कर्णधार नरसिंहन यांची निर्णायक भूमिका राहिली. त्यांच्या 58 व रहिम यांच्या नाबाद 34 धावा मोलाच्या ठरल्या. चार धावांची का होईना आघाडी मिळाल्याने विदर्भाच्या "ड्रेसिंग रूम'मध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, लढाई अजून संपलेली नव्हती. दुसरा डाव अद्याप बाकी होता. त्यामुळे आता सर्व भिस्त गोलंदाजांवर होती. सुदैवाने त्यांनीही निराश केले नाही. गोलंदाजांनी मध्य प्रदेशचा दुसराही डाव 131 धावांत गुंडाळून विजयाच्या आशा उंचावल्या. रहिम व गणोरकर यांनी पुन्हा चार व तीन गडी बाद करून पाहुण्यांची दाणादाण उडविली. 

 
अन्‌ व्हीसीएवर झाला विजयी जल्लोष 


विदर्भाला निर्णायक विजयासाठी 128 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. मात्र, खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता, चौथ्या डावात हे आव्हान सहजसोपे नव्हते. मध्य प्रदेशचे गोलंदाज गायकवाड यांनी लागोपाठ तीन गडी बाद करून एकप्रकारे विदर्भाला धोक्‍याचा इशाराच देऊन टाकला होता. सामना हातून निसटतो की काय असे वाटू लागले होते. त्यामुळे साहजिकच नैराश्‍याचे वातावरण होते. मात्र, सलामीवीर गोसावी यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. त्यांनी एका टोकाने चिवट फलंदाजी करीत विदर्भाला तीन गड्यांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. गोवासींच्या 67 व रहिम यांच्या नाबाद 22 धावांनी विदर्भाची नाव तिरावर लागली. सांघिक प्रदर्शन आणि रहिम यांच्या अष्टपैलू कामगिरीने गाजलेला तो सामना रणजी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय ठरला. विजयानंतर अर्थातच व्हीसीएवर जल्लोषही झाला.