50 वर्षांपूर्वी मिळविला होता विदर्भाने ग्वाल्हेरमध्ये अविस्मरणीय विजय

नरेंद्र चोरे
गुरुवार, 11 जून 2020

विदर्भासाठी 80 धावांचे छोटेसे विजयी लक्ष्य म्हणजे "बाये हात का खेल' होता. मात्र, कुणीही घाई न करता संयमाने फलंदाजी करत 29 षटकांतच तीन गडी गमावून विजयाला थाटात गवसणी घातली. टंडन यांनी पुन्हा नाबाद 24 धावांची खेळी केली. ग्वाल्हेरचे युद्ध जिंकल्यानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी धडाक्‍यात विजय "सेलिब्रेट' केला.

नागपूर : सत्तरच्या दशकातील विदर्भ रणजी संघात रथीमहारथींचा समावेश होता. मात्र, सांघिक कामगिरीअभावी बहुतांश वेळा प्रतिस्पर्धी संघ भारी पडायचे. परंतु, डिसेंबर 1970 मध्ये ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात खेळला गेलेला सामना त्याला अपवाद ठरला. या सामन्यात विदर्भाच्या खेळाडूंनी एकजूटतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत बलाढ्य मध्य प्रदेशला त्यांच्याच भूमीत पराभवाचा दणका देत क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळविली. विदर्भ क्रिकेटच्या इतिहासातील त्या अविस्मरणीय विजयाची आजही चर्चा होते. 

पाच दशकांपूर्वी झालेल्या तीनदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कर्णधार नितीन मेनन यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआचे सचिव राहिलेले संजय जगदाळे व त्यांचे बंधू अशोक जगदाळेंसह राजेश चौहान यांचे वडील गोविंद राजा चौहान, एस. गुलरेज अली, एस. पी. दळवी, एस. सक्‍सेना, व्ही. के. नायडू, नरेंद्र दुआसारखे धुरंधर होते. तर, विदर्भ संघात कर्णधार अरुण ओगिराल, मूर्तिराजन, इम्रान अली, विजय तेलंग, अनिल देशपांडे, विजय पिंप्रीकर, अशोक भागवत, प्रकाश सहस्रबुद्धे, शिरीष नजबिले, एम. जोशी, राकेश टंडन होते. "होमग्राउंडवर'वर खेळणाऱ्या मध्य प्रदेशला विदर्भाने अवघ्या 267 धावांमध्ये गुंडाळून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. प्रेक्षकांचा सपोर्ट असूनही यजमानांचा एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही हे उल्लेखनीय. विदर्भाकडून ओगिराल यांनी तीन आणि देशपांडे व टंडन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

हेही वाचा  : विदर्भाने 29 वर्षांपूर्वी दाखवला होता राजस्थानला इंगा
 

विदर्भाचीही सुरुवात डळमळीतच झाली. 59 धावांमध्ये पहिले चार फलंदाज गमावल्यानंतर आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या सहस्रबुद्धे (नाबाद 74 धावा) यांनी एक टोक सांभाळत विदर्भाला पहिल्या डावात 43 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मधल्या फळीतील नजबिले (47 धावा), इम्रान अली (44 धावा) व राकेश टंडन (40 धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान देत विदर्भाला 310 धावांपर्यंत पोहोचविले. मध्य प्रदेशकडून त्यांच्या चाहत्यांना दुसऱ्या डावात अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, यावेळी त्यांची अवस्था पहिल्या डावापेक्षाही खराब झाली आणि अख्खा संघ 122 धावांत गारद झाला. गुलरेज अली (57 धावा) यांचा अपवाद वगळता यजमान संघाचा एकही फलंदाज खेळपट्‌टीवर टिकू शकला नाही. भागवत यांनी सर्वाधिक तीन आणि देशपांडे, ओगिराल व टंडन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून विदर्भाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. 

धडाक्‍यात केला विजय साजरा 

विदर्भासाठी 80 धावांचे छोटेसे विजयी लक्ष्य म्हणजे "बाये हात का खेल' होता. मात्र, कुणीही घाई न करता संयमाने फलंदाजी करत 29 षटकांतच तीन गडी गमावून विजयाला थाटात गवसणी घातली. टंडन यांनी पुन्हा नाबाद 24 धावांची खेळी केली. ग्वाल्हेरचे युद्ध जिंकल्यानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी धडाक्‍यात विजय "सेलिब्रेट' केला. तर मध्य प्रदेशचे खेळाडू सामन्यादरम्यान झालेल्या चुकांवर आत्मपरीक्षण करीत पुढच्या सामन्याच्या तयारीला लागले. त्या काळात धावा आणि बळींच्या आधारावर गुण मिळत असले तरी, विदर्भाने या सामन्यात मध्य प्रदेशला एकही गुण घेऊ दिला नाही. विदर्भाने आठ गुणांची कमाई केली. मध्य प्रदेशची गुणांची पाटी कोरीच राहिली. "मॅटिन विकेट'वर चेंडू उसळत असल्यामुळे धावा काढणे खूपच कठीण होते. अशा परिस्थितीत सामन्यात सर्वाधिक धावा काढणारे सहस्रबुद्धे यांनीही त्या विजयाला अविस्मरणीय संबोधले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha registered memorable victory at Gwalior