esakal | का लागला जयपूरमधील पराभव विदर्भाच्या जिव्हारी?

बोलून बातमी शोधा

कैलाश गट्टानी

त्या सामन्यात यजमान राजस्थानकडून विदर्भाला एक डाव 182 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही डावांमध्ये विदर्भाच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांपुढे अक्षरश: नांगी टाकली. तो पराभव साऱ्यांच्याच जिव्हारी लागला होता. एक गाजलेला सामना या मालिकेत या सामन्याविषयी...

का लागला जयपूरमधील पराभव विदर्भाच्या जिव्हारी?
sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : करिअरमध्ये काही सामने असे असतात, जे खेळाडू कधीच आठवणीत ठेवू इच्छित नाही. खेळाडूंसाठी ते एकप्रकारचं वाईट स्वप्न असते. असाच कटू अनुभव विदर्भ रणजी संघाला 43 वर्षांपूर्वी जयपूरमध्ये आला होता. त्या सामन्यात यजमान राजस्थानकडून विदर्भाला एक डाव 182 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही डावांमध्ये विदर्भाच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांपुढे अक्षरश: नांगी टाकली. तो पराभव साऱ्यांच्याच जिव्हारी लागला होता.


डिसेंबर 1977 मध्ये खेळल्या गेलेल्या तीनदिवसीय सामन्यात प्रकाश सहस्रबुद्धेच्या नेतृत्त्वातील खेळणाऱ्या विदर्भ संघात कर्णधार सहस्रबुद्धेशिवाय विजय तेलंग, जयंतीलाल राठोड, पी. पनकुले, अशोक भागवत, अनिल देशपांडे, व्ही. मार्कंड, सुनील हेडाऊ, यू. दळवी, एम. एस. जोशी व युवा सुहास फडकरसारखे त्या काळातील नावाजलेले क्रिकेटपटू होते. अष्टपैलू कैलाश गट्‌टानींच्या नेतृत्वात खेळलेल्या राजस्थान संघातही हनुमंतसिंग, सुरेश शास्त्री, के. माथूर, व्ही. माथूर, व्ही. सोनी, पी. पांडे, पी. शर्मा, टी. चॅटर्जी, पी. आर्य व बी. पी. सिंगसारखे रथीमहारथी होते. मुळात वैदर्भी खेळाडूंना खेळपट्‌टीचा (मॅटिन विकेट) अंदाजच घेता आला नाही. माथूर-शास्त्री या फिरकी जोडीने विदर्भाला चहापानापूर्वीच 80 धावांत गुंडाळून अर्धीअधिक लढाई जिंकली. उर्वरित काम फलंदाजांनी केले. विदर्भाचा एकही फलंदाज दोन्ही डावांमध्ये पंचविशीही गाठू शकला नाही. शास्त्री यांनी पाच व गट्‌टानींनी चार गडी बाद करून विदर्भाची दाणादाण उडविली.

वाचा - लढाई जिंकली, पण युद्ध हरले!

ज्या खेळपट्‌टीवर विदर्भाच्या फलंदाजांना एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागला, त्याच खेळपट्‌टीवर राजस्थानने 302 धावा ठोकल्या. शर्मा यांनी 94 व आठव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या व्ही. माथूर यांनी 58 धावा फटकावून राजस्थानला 222 धावांची भक्‍कम आघाडी मिळवून दिली. इतरही दोघा-तिघांनी 20-30 धावांचे भरीव योगदान दिले. विदर्भाकडून मध्यमगती गोलंदाज भागवत यांनी पाच गडी अवश्‍य बाद केले. परंतु, यजमानांवर अंकुश ठेवण्यात त्यांचेही प्रयत्न अपुरे पडले.

आणखी वाचा - केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय!

दुसऱ्या डावातही "हाय रे देवा!'
डावाने पराभव टाळण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या विदर्भाची दुसऱ्या डावात आणखीनच अवस्था वाईट झाली. अख्खी टीम 28 षटकांत 40 धावांमध्ये गारद झाली. राजस्थानच्या तुफानी माऱ्यापुढे विदर्भाचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. सर्वाधिक नाबाद नऊ धावा हेडाऊ यांनी काढल्या. गट्‌टानींनी पाच आणि माथूर व सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून राजस्थानला एक डाव 182 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. सामन्यानंतर साहजिकच वैदर्भी खेळाडूही मानसिकदृष्ट्या पार खचून गेले. आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील तो सर्वांत वाईट अनुभव होता, असे समजून खेळाडूही जयपूरच्या आठवणी तिथेच विसरून गेले.