अवघड क्षेत्रातील शाळांचे काय? सीईओंन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना खडसावले

नीलेश डोये
Monday, 12 October 2020

शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओ योगेश कुंभेजकर यांचा भेट घेत सर्व जागा खुल्या करण्याची मागणी केली. परंतु सीईओ ९० जागांवर कायम आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्र्या अवलंबणार असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : जिल्हा परिषदेतील विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांची बदलीचा विषय चिघळण्याचे चिन्ह आहेत. शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओ योगेश कुंभेजकर यांचा भेट घेत सर्व जागा खुल्या करण्याची मागणी केली. परंतु सीईओ ९० जागांवर कायम आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्र्या अवलंबणार असल्याचे सांगण्यात येते.

जिल्हा परिषदेत ९० रिक्त जागांवर शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यातील ४६ पदे ही अधिसंख्य शिक्षकांची असून, आंतरजिल्हा बदलीने ४४ शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. नवीन पदस्थापना देताना ग्रामविकास विभागाने विस्थापित व रॅण्डम शिक्षकांना प्राधान्य द्यावे, यासंदर्भात ४ सप्टेंबर २०१९ रोजी शासन परिपत्रक काढले होते. जिल्ह्यात विस्थापित व रॅण्डमच्या शिक्षकांची संख्या २४३ आहे. प्रशासनाने पूर्वी बदल्या करताना काही निवडक पंचायत समितीच्या ९० जागाच खुल्या केल्या होत्या. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता.

शिक्षक बदल्यांचा विषय मंत्री सुनील केदारांच्या दरबारी

जिल्ह्यात रिक्त असलेल्या १९० जागा खुल्या कराव्यात, अशी संघटनांची मागणी होती. गेल्या काही दिवसापासून हाच विषय गाजत आहे. विविध शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी आज पुन्हा सीईओ कुंभेजकर यांची भेट घेतली. शिक्षकांची मागणी फेटाळून लावत अवघड क्षेत्रातील शाळांचे काय, असा सवाल करीत चांगलेच खडसावले.

१४० जागांची अफवा
प्रशासन ९० जागांवर कायम आहे. दरम्यान ५० जागांची वाढ करून १४० झाल्याची चर्चा दिवसभर होती. यासाठी एका पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा होती. परंतु ही अफवा असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ही अफवा पतरविण्यात आल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांकडून बदलीसंदर्भात प्रशासनावर राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. १४० जागांवर समझोता झाल्याची अफवा हा त्यातीलच एक प्रकार असल्याची चर्चा आहे.

४० अर्ज
बदलीसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत फक्त ४० जणांचेच अर्ज आले. १५ ला बदलीसंदर्भात समुपदेशन होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What about schools in difficult areas? CEOs shouting teacher's union officials