अर्धवट पुलाचा सांगा फायदा तरी काय ?

गुमगावः अर्धवट असलेला वेणा नदीवरील पूल.
गुमगावः अर्धवट असलेला वेणा नदीवरील पूल.

गुमगाव (जि.नागपूर): येथील वेणा नदीवरील पुलाचे बांधकाम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. अर्धवट पुलाचे बांधकाम सध्या कित्येक दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अर्धवट आणि रखडलेल्या पुलाचा सांगा फायदा तरी काय, असा प्रश्न सध्या विद्यार्थी, शेतकरी, मजुर, कामगार आणि वाहनधारक विचारत आहेत.

बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीने धरला जोर            
जिल्ह्यातील नागपूर, हिंगणा, गुमगाव, वागधरा, कोतेवाडा, खडका, शिवमडका, धानोली, कान्होली, दाताळा, वडगाव-गुजर, सुमठाणा, सालईदाभा, डोंगरगाव, खापरी, बुटीबोरी, मिहान, संदेश सिटी, एमपेरिअम सिटी, सुकळी,पांजरी, देवळी-सावंगी, जामठा, चिंचभवन यासारख्या कित्येक लहान-मोठ्या गावांना आणि शहरांना जोडणाऱ्या गुमगाव-डोंगरगाव रस्त्यावरील वेणा नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम गेल्या कित्येक दिवसांपासून थंडबस्त्यात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. आमदार समीर मेघे यांच्या हस्ते आणि अंबादास उके, वंदना पाल, सुधाकर ढोणे, धनराज आष्टनकर, हरिश्चंद्र अवचट, राजेंद्र वाघ, पंचायत समिती सदस्य शोभा आष्टनकर, भैय्याजी कुमरे, सुरेश काळबांडे, सुवर्णा खोबे, आतिश उमरे, विशाल भोसले यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आलेल्या अर्धवट पुलामुळे नागरिक व वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या पुलाच्या बांधकामातील अडथळे तात्काळ दूर सारून अर्धवट व रखडलेल्या पुलाचे बांधकाम ताबडतोब सुरू करण्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे.

वाहनधारकांना अडचणींचा फेरा
गुमगाव परिसरातील हजारो शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरदार, मजुरवर्ग, कामगार आपल्या रोजीरोटीसाठी हिंगणा, नागपूर, डोंगरगाव, खापरी, बुटीबोरी, वानाडोंगरी, टाकळघाट, मिहान, चिंचभवनला जातात. नदीवरील अर्धवट पुलामुळे वाहनधारकांना नाईलाजास्तव अडचणींचा फेरा सहन करावा लागत आहे. अर्धवट पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे.
-अरविंद वाळके
सामाजिक कार्यकर्ते

अर्धवट पुलामुळे अपघाताची शक्यता
परिसरातील शेतकरी आणि मजुरवर्गाला शेती आणि आपल्या नियोजित कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि पर्यायाने वेळ वाचविण्यासाठी अर्धवट पुलामुळे नदीतून सुद्धा प्रवास करावा लागत आहे. नदीमध्ये जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्याचा योग्य अंदाज येत नसल्याने एखाद्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
-गणपतराव सोनकुसळे
सामाजिक कार्यकर्ते

संपादनः विजयकुमार  राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com