'सकाळ'च्या वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी खेळाडूंना कोणता दिला सल्ला… वाचा सविस्तर 

file photo
file photo


नागपूर : कोरोनामुळे खेळाडू सहा महिन्यांपासून घरी बसल्यामुळे निराश व चिडचिड झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकप्रकारचे नैराश्य आले आहे. अशा परिस्थितीत नाउमेद न होता घरीच फिटनेस आणि वर्कआऊट करून शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर देणे गरजेचे आहे. या कठीण प्रसंगी खेळाडूंना योग्य मार्गदर्शनाची व समुपदेशनाची आवश्यकता आहे. समाज व सरकारची साथ हवी असल्याचे मत क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. परिस्थिती लवकरच बदलणार असल्याने सर्वांनी आशावादी राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

दैनिक 'सकाळ'च्या वतीने 'कोविडकाळात व नंतर खेळांची संभाव्य स्थिती' या विषयावर मंगळवारी आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते. वेबिनारमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक व माजी आंतरराष्ट्रीय धावपटू डॉ. शरद सूर्यवंशी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते माजी राष्ट्रीय बास्केटबॉलपटू शत्रुघ्न गोखले आणि हिस्लॉप महाविद्यालयाच्या क्रीडा विभागप्रमुख व माजी राष्ट्रीय फ़ुटबॉलपटू डॉ. कल्पना जाधव हे तज्ञ सहभागी झाले होते. 

डॉ. जाधव म्हणाल्या, कोरोनाची स्थिती केवळ खेळाडूंसाठीच नव्हे, सर्वांसाठीच कठीण काळ आहे. कोरोनाने प्रत्येकालाच फटका बसला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे. खेळाडूंना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो आहे. लॉकडाउन असल्यामुळे इच्छा असूनही घराबाहेर पडू शकत नाही. अशा वेळी खेळाडूंमध्ये चिडचिड व नैराश्य दिसून येत आहे. परंतु खेळाडूंनी कसलाही तणाव घेऊ नये. अशा परिस्थितीत घरच्या घरी हलका व्यायाम करण्याची आज खूप गरज आहे. त्यामुळे नैराश्य घालविण्यात खूप मदत होऊ शकते. शिवाय खेळाडूंना शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे तितकेच आवश्यक आहे. कोरोनाकाळात पालकांनीही आपल्या मुलांच्या सदैव पाठीशी असणे जरुरी आहे. त्यासोबतच समाज व सरकारचीही त्यांना साथ हवी आहे. तरच खेळाडू अडचणीच्या काळातून बाहेर पडू शकेल. 

शत्रुघ्न गोखले म्हणाले, खेळाडूंसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असली तरी संयम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. नजीकच्या काळात 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिट्ज' विशेषतः वैयक्तिक खेळ सुरू होण्याची शक्यता वाटत असल्याने, त्यासाठी खेळाडूंना शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार राहण्याची गरज आहे. त्यामुळे हळूहळू सरावास सुरुवात करायला काहीच हरकत नाही. वैयक्तिक खेळांमध्ये खेळाडू एकमेकांच्या थेट संपर्कात येत नाहीत. त्यामुळे या खेळातील खेळाडूंनी आशा करायला हरकत नाही. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये यापूर्वीच खेळ सुरू झाले असून, त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहे. मला सर्वाधिक चिंता वयोगटातील खेळाडूंची वाटते आहे. कारण त्यांना यावर्षी खेळण्याची संधी न मिळाल्यास संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकते. अशा वेळी संघटनेने त्यांना सूट द्यायला पाहिजे, जेणेकरून ते पुढील वर्षी खेळू शकेल. 

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लॉकडाउन हटला असला तरीही खेळाडूंसाठी आजही लॉकडाउनसारखीच स्थिती आहे. सर्वच 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिट्ज' बंद आहेत. अशा वेळी खेळाडूंनी व्यस्त राहणे अतिशय आवश्यक आहे. अनेकांनी खुल्या रस्त्यांवर धावण्याचा शोधून यातून मार्ग शोधला आहे. खेळाडूंनी सायकलिंग किंवा घरात बसून इतर हलकेफुलके व्यायाम व इनडोअर वर्कआउट करण्यावर भर देणे गरजेचे आहे. शक्य असल्यास दिवसातून काही वेळ मैदानांवर घालविणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःला तंदुरुस्त ठेवून भविष्यात खूप फायदा होईल. उल्लेखनीय म्हणजे कोरोनाकाळात प्रत्येक खेळाडूने आत्मपरिक्षण करून आपल्या खेळात सुधारणा करण्यावर जोर दिला पाहिजे. सुदैवाने कोरोनाने खेळाडूंना फार मोठी संधी दिली आहे. 


 

क्रीडातज्ज्ञांचा सल्ला 

- खेळाडूंनी निराश न होता संयम ठेवावा. 

- कोरोनाकाळात खेळाडूंनी विनाकारण तणाव घेऊ नये. 

- खेळाडूंनी घरच्या घरी हलका व्यायाम करावा तसेच शक्य असल्यास काही वेळ मैदानांवर अवश्य घालवावा. 

- 'सोशल डिस्टनसिंग' व मास्क व सॅनिटायझर्सचा नियमित वापर करा. 

-आहाराची योग्य काळजी घ्या. 

- रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर विशेष भर द्यावा. 

-आत्मपरिक्षण करून आपल्या खेळात सुधारणा करा. 

- कोरोनाचे संकट लवकर संपेल असा आशावाद बाळगा. 

- सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा. 

- या कठीण काळात पालक, समाज व सरकारने खेळाडूंना मदत करा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com