राज ठाकरेंच्या मागणीनंतर वडेट्टीवारांनी केली स्वाक्षरी! वाचा नेमके काय

अतुल मेहेरे
Friday, 14 August 2020

राज ठाकरे यांनी जेव्हा मागणी केली होती, तेव्हाही मी हेच बोललो होतो की जनतेच्या आरोग्यासाठी आणि एक व्यवसाय म्हणून जीम संचालकांच्या दृष्टीनेही जीम सुरू होणे गरजेचे आहे. पण मी या खात्याचा मंत्री असलो, तरीही एकटा निर्णय घेऊ शकत नाही.

नागपूर : कोरोनामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून जनजीवन पूर्वपदावर येते आहे. तरीही अजूनही सिनेमा हॉल, जिम आदी व्यवसाय बंदच आहेत. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हा संपूर्ण बाजारपेठेसह जीमसुद्धा बंद करण्यात आले होते. एकेक करून बाजार उघडत असले तरी जीम अद्यापही बंदच आहेत. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जीम सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यांची ती मागणी रास्तच होती, असे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार आज म्हणाले. येत्या दोन दिवसांत जीम सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे यांनी जेव्हा मागणी केली होती, तेव्हाही मी हेच बोललो होतो की जनतेच्या आरोग्यासाठी आणि एक व्यवसाय म्हणून जीम संचालकांच्या दृष्टीनेही जीम सुरू होणे गरजेचे आहे. पण मी या खात्याचा मंत्री असलो, तरीही एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सर्वांशी चर्चा करुन एकमताने निर्णय घेतला जातो. ही प्रक्रिया आता झाली आहे. जीम सुरू करण्याबाबतच्या फाईलवर माझी सही झालेली आहे, एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचीदेखील सही त्यावर होईल आणि त्यानंतर ताबडतोब जीम सुरू केले जातील.

सविस्तर वाचा - अरे वाह! चंद्रपूरच्या या बहिणीने थेट पंतप्रधानांसाठी पाठवली ही खास भेट..आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाळला दिलेला शब्द

गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले जीम सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी यापुढे जीमच्या संचालकांना सरकारने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यामध्ये कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेदेखील प्रावधान करण्यात आले आहे. जीम सुरू करण्याची आवश्‍यकता होतीच. नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले होते. सोबतच जीम मालकांच्या व्यवसायाचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. हा व्यवसाय पूर्णतः मोडकळीस आला होता. सर्वांचीच ही मागणी असल्यामुळे सरकारने सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a demand of Raj Thakare?