आयुक्त मुंढे व लोकप्रतिनिधी वादावर काय म्हणाले फडणवीस? वाचा

राजेश प्रायकर
Monday, 3 August 2020

शहरात लोकप्रतिनिधी व आयुक्त तुकाराम मुंढे असा संघर्ष सुरू आहे. महापौर संदीप जोशी यांनी तर आयुक्तांविरोधात न्यायालयात धाव घेतली. कोरोनाच्या संकटकाळातही लोकप्रतिनिधी व आयुक्त एकत्र न येता, वेगवेगळे दौरे करीत आहेत. नागपुरातील या संघर्षाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.

नागपूर : महापालिकेत लोकप्रतिनधी आणि आयुक्त तुकाराम मुंढे असे चित्र गेल्या काही महिन्यांत तयार झाले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडत प्रथमच वक्तव्य केले. लोकप्रतिनिधी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांना एकत्र बसवून तोडगा काढावा, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला. त्याच वेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही फडणवीस यांनी मानसिकता बदलण्याचा उपदेश दिला.

शहरात लोकप्रतिनिधी व आयुक्त तुकाराम मुंढे असा संघर्ष सुरू आहे. महापौर संदीप जोशी यांनी तर आयुक्तांविरोधात न्यायालयात धाव घेतली. कोरोनाच्या संकटकाळातही लोकप्रतिनिधी व आयुक्त एकत्र न येता, वेगवेगळे दौरे करीत आहेत. नागपुरातील या संघर्षाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.

दोन दिवसांपूर्वी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच या वादावर वक्तव्य केले. लोकप्रतिनिधी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वादात सरकारने लक्ष घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केवळ भाजपचा महापौर आहे म्हणून सर्व भांडणे आहेत, असे नाही. आयुक्तांविरोधात पहिली तक्रार तर काँग्रेस आमदारांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसप हे सर्व पक्ष त्यांच्या विरोधात का आले? काहीतरी चुकतंय हे आयुक्तांनी लक्षात घ्यायला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना विचारणारच नाही या मानसिकतेतून काम व्हायला नको, असे नमूद करीत फडणवीस यांनी आयुक्त मुंढे यांच्यावरही ताशेरे ओढले.

हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण..

राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे. दोघांनाही एकत्र बसवायला हवे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असे निर्देश आयुक्तांना द्यायला हवे, असा सल्ला फडणवीस यांनी सरकारला दिला.

 
मुख्यमंत्री आयुक्तांच्या पाठीशी
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी आयुक्त मुंढे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले होते. आयुक्त मुंढे यांनी काही कठोर नियम, कायदे अमलात आणले. हे काही जणांना परवडत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांना लावला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did Fadnavis say on the issue of people's representative and commissioner Mundhe?