पालकमंत्र्यांना महिनाभरातच कशाचा पडला विसर? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर
Monday, 14 September 2020

महिनाभरात असे काय घडले की पालकमंत्र्यांना स्वतःच्याच घोषणेचा विसर पडला? असाही प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे शहरात दररोज पन्नासावर मृत्यू होत आहे. दोन हजारांवर बाधित आढळून येत असून प्रशासकीय यंत्रणा कागदी घोडे पुढे करीत असल्याचे चित्र आहे. आणखी किती बळी जाईल, तेव्हा प्रशासनाला ठोस उपाययोजना सापडतील? असा संतत्प प्रश्न विचारला जात आहे.

नागपूर : मागील महिन्यात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात जम्बो हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली. मात्र, आज झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी जम्बो हॉस्पिटलबाबत शब्दही काढला नाही. त्यामुळे महिनाभरातच पालकमंत्र्यांना जम्बो हॉस्पिटलचा विसर पडल्याची चर्चा रंगली आहे. आता त्यांनी डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलची संख्या वाढविण्यावर भर दिला.

पालमकंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात कोव्हीडच्या स्थितीवर आढावा बैठक घेतली. मागील १६ ऑगस्टला पालकमंत्र्यांनी याच विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन जम्बो हॉस्पिटलची घोषणा केली होती.

‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियमवर तसेच कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यासामधील सेंटर आणि मानकापूर येथील क्रीडा संकुलावर विचार करण्यात आला. जम्बो हॉस्पिटलसाठी पालकमंत्र्यांनी क्रीडा संकुलावर शिक्कामोर्तब केले होते.

वाढत्या रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करून शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे. या रुग्णालयामुळे कोरोनाग्रस्तांशिवाय इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वासही डॉ. राऊत यांनी व्यक्त केला होता. परंतु आज त्याच ठिकाणी झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी जम्बो हॉस्पिटलबाबत शब्दही काढला नाही.

बापरे हे काय... कोव्हिड सेंटर तयार करण्यास खाजगी रुग्णालयांचे हात वर, वाचा सविस्तर

त्यामुळे महिनाभरात असे काय घडले की पालकमंत्र्यांना स्वतःच्याच घोषणेचा विसर पडला? असाही प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे शहरात दररोज पन्नासावर मृत्यू होत आहे. दोन हजारांवर बाधित आढळून येत असून प्रशासकीय यंत्रणा कागदी घोडे पुढे करीत असल्याचे चित्र आहे. आणखी किती बळी जाईल, तेव्हा प्रशासनाला ठोस उपाययोजना सापडतील? असा संतत्प प्रश्न विचारला जात आहे.
 
जम्बो हॉस्पिटलसाठी आमदार ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र
शहरातील विदारक स्थितीची माहिती देतानाच आमदार विकास ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागपुरात जम्बो रुग्णालय उभारण्याची मागणी केली. नागपुरातील गरीब जनता खाजगी रुग्णालयाचे लाखोंचे बिल भरण्यास असमर्थ असून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये खाटा उपलब्ध नाही. एका एका खाटेसाठी रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर उपराजधानीतही जम्बो रुग्णालय उभारण्यास मदत करावी, असे ठाकरे यांनी पत्रात नमुद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did the Guardian Minister forget within a month? Read detailed