अर्थव्यवस्था संकटात असताना काय करणार गडकरी?वाचा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

आत्मनिर्भर भारत आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात संधी, या विषयावर ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. अर्थव्यवस्था संकटात असताना ती मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना आणि एकसंध राहण्याची आवश्‍यकता आहे.

नागपूर : संकटकाळात अर्थव्यवस्थेसमोर अधिक समस्या आणि आव्हाने असताना सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना एमएसएमईमार्फत अधिक बळकट करण्याचे आपले प्रयत्न असून त्यासाठीच एमएसएमईत परकीय भांडवल, गुंतवणूक आणण्याचेही प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

आत्मनिर्भर भारत आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात संधी, या विषयावर ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. अर्थव्यवस्था संकटात असताना ती मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना आणि एकसंध राहण्याची आवश्‍यकता आहे. बॅंका, वित्तीय संस्था, कृषी, ग्रामीण भागाचा विकास आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. बाजारात खेळते भांडवल येऊन अधिक मागणी निर्माण व्हावी, उद्योगांमध्ये सार्वजनिक खाजगी व परकीय गुंतवणूक आणि भांडवल यावे, यासोबतच उत्पादन मालावर होणारा खर्च कमी व्हावा, वाहतूक खर्च कमी, व्हावा, आयात कमी होऊन निर्यात वाढावी, पायाभूत सुविधांमध्ये अधिक वाढ व्हावी, हा आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे.

सविस्तर वाचा - Video : अमरावतीतील तीन मजली व्यापारसंकुल कोसळले! आणि...

केंद्र शासनाच्या भूमिका अत्यंत सकारात्मक असून उद्योग-व्यापाराला मदतीचीच भूमिका पंतप्रधान मोदी यांची आहे. रस्ते वाहतूक क्षेत्राचे चित्र आम्ही बदलून टाकले आहे. दिल्ली मुंबई एक़्स्प्रेस हायवे हा हरित मार्ग होत आहे. याशिवाय 22 हरित राष्ट्रीय महामार्ग निर्माण केले जात आहेत. यामुळे वेळ आणि इंधन खर्चात कमालीची बचत होणार आहे. महामार्गांवर चालणारे ट्रक सीएनजीवर चालले पाहिजेत. डिझेलच्या तुलनेत 50 टक्के बचत यातून होणार आहे. ट्रक सीएनजीवर करण्यात येणारा खर्च 2 वर्षात वसूल होणार आहे. यामुळे वाहतूक खर्चही कमी होईल. प्रदूषणही होणार नाही. सर्वच क्षेत्रात या पध्दतीनुसार वैचारिक भूमिका घेऊन परिवर्तन करणे आत्मनिर्भरतेकडे पडणारे पाऊल असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the solution on strugglinge economy due to corona