प्रवासी भाड्याव्यतिरिक्त उत्पन्नासाठी महामेट्रोने उचलले कोणते पाऊल? वाचा

राजेश प्रायकर
Monday, 10 August 2020

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी नॉन-फेअर बॉक्समधून मिळणाऱ्या महसुलातूनच मेट्रोला स्वावलंबी बनविण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात वेबिनार होणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, पुणे, मुंबई, रायपूर तसेच लंडन, अमेरिका, दुबई, सिंगापूर आणि इतर देशांतील संबंधित व्यक्ती, कंपनी आणि संघटना वेबिनारमध्ये सहभागी होतील.

नागपूर : महामेट्रोने उत्पन्नासाठी प्रवासी भाड्याव्यतिरिक्त विविध पर्यायांचा विचार केला आहे. आता मेट्रो स्टेशनचे नाव, प्रॉपर्टी डेव्हलपमेंटद्वारे महसुलावर भर दिला जाणार असून, याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांसोबत चर्चेसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर राष्ट्रीय उद्योजक, स्टार्ट अप उद्यमी, व्यावसायिक या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी नॉन-फेअर बॉक्समधून मिळणाऱ्या महसुलातूनच मेट्रोला स्वावलंबी बनविण्याचा मानस व्यक्त केला आहे. द इंडस आंत्रप्रेनिअर्स (टीआय) व मेट्रोच्या संयुक्त विद्यमाने नागपूर ‘मेट्रो सोबत व्यवासायिक संधी` यावर १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजतापर्यंत होणाऱ्या वेबिनारमध्ये चर्चा होणार आहे.

डॉ. दीक्षित यांच्या मार्गदर्शनात हे वेबिनार होणार आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, पुणे, मुंबई, रायपूर तसेच लंडन, अमेरिका, दुबई, सिंगापूर आणि इतर देशांतील संबंधित व्यक्ती, कंपनी आणि संघटना वेबिनारमध्ये सहभागी होतील.

वेबिनारमध्ये महामेट्रोच्या नॉन फेअर बॉक्स महसूल निर्मितीच्या पद्धतीबद्दल चर्चा केली जाईल. नॉन-फेअर बॉक्स महसुलाच्या विविध घटकांमध्ये मालमत्ता विकास (प्रॉपर्टी डेव्हलपमेंट), मेट्रो स्टेशनचे सेमी-नेमिंग, जाहिरातींसंबंधी काही तरतुदींचा समावेश आहे.

तुकाराम मुंढेंनी `या` हॉस्पिटलला दिला इशारा. म्हणाले, रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करा अन्यथा..

वेबिनारमध्ये प्रकल्पाची स्थिती, कियॉस्कची उपलब्धता, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट स्पेस, ब्रँडिंग आणि मार्केटिंगची संधी, मेट्रो स्थानकांमधील फूड जॉइंट जंक्शन यासारख्या व्यवसायाच्या संधींचा तपशील देण्यात येईल, तसेच वाटप प्रक्रियेची रूपरेषा देखील सांगण्यात येईल.

भाड्याने दिल्या जागा
महामेट्रोने यापूर्वीच नॉन-फेअर बॉक्स महसूल मिळवण्यास सुरुवात केली. महामेट्रोने एयरपोर्ट, इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स मेट्रो स्टेशनवरील जागा विविध कंपन्यांना व्यवसायाकरिता भाडे तत्त्वावर दिल्या आहेत. तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्रला सीताबर्डी ते लोकमान्यनगरापर्यंत धावणारी मेट्रो ट्रेन जाहिरातीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What steps has Mahametro taken to generate revenue in addition to passenger fares?