आदर्श शिक्षक गौरव सोहळा केव्हा ?

मंगेश गोमासे
Monday, 5 October 2020

आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षकांसाठी मोठ्या गौरवाची गोष्ट असते. तो मिळावा, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते. विद्यापीठाच्या शिक्षक कल्याण निधीअंतर्गत दरवर्षी शिक्षक, प्राचार्य, संशोधक, लेखक शिक्षक आदींकडून विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागवले जातात. यासाठी विद्यापीठातर्फे माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेत निवड समिती तयार केली जाते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. मात्र, विद्यापीठात पहिल्यांदाच शिक्षक दिनाला महिना लोटूनही यंदा विद्यापीठाने शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून आदर्श शिक्षक गौरव सोहळा केव्हा ? असा सवाल आता शिक्षक, प्राचार्य करीत आहेत.

आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षकांसाठी मोठ्या गौरवाची गोष्ट असते. तो मिळावा, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते. विद्यापीठाच्या शिक्षक कल्याण निधीअंतर्गत दरवर्षी शिक्षक, प्राचार्य, संशोधक, लेखक शिक्षक आदींकडून विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागवले जातात. यासाठी विद्यापीठातर्फे माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेत निवड समिती तयार केली जाते.

नागपूर विद्यापीठ सुरू करणार लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम; वर्ग, नोट्स, परीक्षा सर्वकाही एकाच प्लॅटफॉर्मवर       

या समितीकडे आलेल्या अर्जांमधून उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक, सामाजिक कार्यात अग्रेसर आदींसाठी शिक्षकांची निवड करून त्यांचा गौरव केला जातो. यंदा माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेत निवड समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून यादी विद्यापीठाकडे सोपवली. मात्र, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे ६ सप्टेंबरपर्यंत शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने विद्यापीठाने ५ सप्टेंबर रोजीचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम स्थगित केला. मात्र, करोनाच्या सावटामुळे विद्यापीठाने महिना लोटूनही शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षक, प्राचार्य यांच्यात नाराजी आहे.

लवकरात लवकर निर्णय घ्या
या पुरस्काराची घोषणा वेळेवर होणे अपेक्षित होते. राष्ट्रीय दुखवट्यामुळे कार्यक्रम झाला नाही हे ठीक. मात्र, त्यानंतर एक दोन दिवसात कार्यक्रम घेता आला असता. कार्यक्रम टाळणे ही बाब चुकीची असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी अर्जदार शिक्षकांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When is the best Teacher Award function ?