नागपुरात कधी होईल गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय? 

केवल जीवनतारे
Saturday, 8 August 2020

तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नागपुरात गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे उपकेंद्र तयार करण्याची घोषणा केली होती. साडेपाच एकर जागेत २१ कोटी रुपये खर्चून उपकेंद्र हे संग्रहालय तयार करण्याचा आराखडा तयार केला होता.

नागपूर : सिव्हिल लाइन परिसरात गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे उपकेंद्र उभारण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता. २०१४-१५ या वर्षात १० कोटी, तर २०१५-१६ या चालू वर्षात ११ कोटींची तरतूद करण्यात आली. वारंवार जागेचा होणारा जागेचा बदल थांबला. सुराबर्डी येथील जागा निश्चित झाली. मात्र, तत्कालीन शासनाने याकडे दुर्लक्ष केले. आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला चळवळीतील काही आदिवासी बांधवांनी या विषयाला वाट मोकळी करून दिली. 

तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नागपुरात गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे उपकेंद्र तयार करण्याची घोषणा केली होती. साडेपाच एकर जागेत २१ कोटी रुपये खर्चून उपकेंद्र हे संग्रहालय तयार करण्याचा आराखडा तयार केला होता. नागपूरच्या आदिवासी विभागाच्या अखत्यारीतील सिव्हिल लाइन येथील भूखंडावर आदिवासी संग्रहालय तसेच प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निश्‍चित झाले. मात्र, या केंद्रासाठी ही जागा अपुरी असल्याचे पुढे आले.

यामुळे या केंद्राचे कामाची गती मंदावली. पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे आयुक्त संभाजीराव सरकुंडे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांनी सिव्हिल लाइन येथील जागेची पाहणी केली. ३० जून २०१५ रोजी बांधकामास मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु, ही जागादेखील बदलण्यात आली.   

हेही वाचा : वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; दोघांचा खून 

दृष्टिक्षेपातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय
आदिवासी सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहेत. ४५ जमाती आहेत. बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत; परंतु संस्कृतीचा गाभा एक आहे. वारलींचा तारपा, बोहाडा, कोकणांचा पावरा, मांदल व डोंगऱ्यादेव, डांगीनृत्य, कोळम, गोंडांचे दंडारीनृत्य, भिल्ल-पावरा कोरकूंचे होळीनृत्य आदींसह आदिवासींनी नवनवीन कलांना जन्म दिला आहे. पारंपरिक ‘रेला’ हे नृत्य या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मौल्यवान दुर्मीळ वस्तू, आदिवासींचे दागदागिने, देवदेवता, मुखवटे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू, शेतीसाठी वापरली जाणारी हत्यारे, आदिवासींचा पोषाख संग्रहालयात असतील. या संस्कृतीचे लोकसंगीत, लोकनृत्य, चित्रकलेसह लोकवाङ्मय व संशोधनाचे कार्य गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयातून होईल.

 

४ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार नागपुरात गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाच्या उपकेंद्राला मान्यता देण्यात आली. सुरुवातीला चिखली येथील जागेची पाहणी केली. नंतर सिव्हिल लाइन येथील आदिवासी विभागाची जागा निश्‍चित झाली. पुन्हा अपुरी जागा असल्याचे कारण पुढे आणले. अंबाझरी परिसरात उपकेंद्र हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आता सुराबर्डी येथील जागा उपकेंद्रासाठी निश्चित झाली. मात्र, अद्याप हा प्रस्ताव कागदावरच आहे. राज्यात १ कोटी आदिवासी आहेत; परंतु त्यांच्या भावनांचा आदार केला जात नाही. २०१६ पासून दै. सकाळ पाठपुरावा करीत आहे, हे विशेष.
-मनोज उईके, आदिवासी विद्यार्थी संघ, नागपूर

 

(संपादन : मेघराज मेश्राम)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the Gondwana Tribal Cultural Museum be set up in Nagpur?