उपराजधानीत दान मिळालेल्या ‘प्लाझ्मा’चा वापर नाही 

केवल जीवनतारे
Monday, 10 August 2020

मेडिकल आणि मेयोत २८ युनिट प्लाझ्मा दानातून मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर नागपुरात मेयो रुग्णालयात एका व्यक्तीने एक नाही तर दोन वेळा सामाजिक बांधिलकीतून त्यांनी प्लाझ्मा दान केला. यासंदर्भात मेयो, मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला; परंतु त्यांनी चुप्पी साधली. 

नागपूर : कोरोना आजारातून मुक्त झालेल्यांची संख्या मोठी आहे. अशा वेळी अत्यवस्थ कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा पर्याय राज्यभरात उपलब्ध झाला आहे. कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्‍सिजन आणि अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते, अशा गंभीर कोरोनाबाधितांवर ‘प्लाझ्मा’ थेरपीचा उपयोग करावा, असे संकेत आहेत. तशी ही थेरपी वरदान ठरली आहे, असे प्रयोगातून सिद्ध झाले. यामुळेच राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्लाझ्मा थेरपी युनिट तयार झाले. मात्र, उपराजधानीत तयार झालेल्या युनिटमध्ये दान मिळालेला ‘प्लाझ्मा’ वापर करण्यात आला नाही. तर केवळ मेडिकल-मेयोच्या रक्तपेढीची शान वाढवत असल्याचा भास होतो आहे. प्लाझ्मा थेरपीच्या वापरात येथील डॉक्टरांनाच रस नसल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना आजारामधून सरकारी आणि खासगी उपचार घेऊन बरे झालेल्या सर्व रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करावे, असा सूर सुरू आहे. प्लाझ्मा दानकर्त्यांशी संपर्क साधून प्लाझ्माचे दान मिवळवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित प्लाझ्मा युनिटमधील प्रमुखांनी प्रयत्न करावे, असे वैद्यकीय संचालक कार्यालयातून सांगण्यात येते. मेडिकलमध्ये सध्या १८ युनिट तर मेयोत ११ युनिट प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्‍णांवरील वापरासाठी तयार आहे. 

नागपूरच्या मेडिकलमध्ये अमरावती येथील एका डॉक्टरवर वापर करण्यात आला. मात्र, त्यानंतर एकाही रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला नाही. हा वापर का होत नाही, हा मेयोमेडिकलसाठी संशोधनाचा विषय बनला आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी दाते पुढे येताना दिसत आहेत. मेडिकल आणि मेयोत २८ युनिट प्लाझ्मा दानातून मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर नागपुरात मेयो रुग्णालयात एका व्यक्तीने एक नाही तर दोन वेळा सामाजिक बांधिलकीतून त्यांनी प्लाझ्मा दान केला. यासंदर्भात मेयो, मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला; परंतु त्यांनी चुप्पी साधली. 

४ हजारांपैकी केवळ १४ जण दानकर्ते 
नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल आणि एम्समधून सुमारे ४ हजार बाधितांनी कोरोनाला हरवले. मात्र, चार हजार कोरोनामुक्तांपैकी केवळ १४ व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. यातील एकाचा प्लाझ्मा तेवढा वापर झाला. उर्वरित २७ युनिट प्लाझ्मा मेडिकल, मेयोच्या रक्तपेढीत केवळ शान म्हणून ठेवला आहे. विशेष असे की, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून २८ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणताही रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतो. एका वेळेस एक रुग्ण ४०० मिलि प्लाझ्मा दान करू शकतो. १५ दिवसांच्या अंतराने २-३ वेळेसही प्लाझ्मा दान करू शकतो. प्लाझ्मा दान केल्याने रुग्णाला कोणताही त्रास होत नाही. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर चार महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करता येतो. 

हेही वाचा : वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; दोघांचा खून 

मृत्युदर वाढूनही का होत नाही वापर? 
एकीकडे कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींकडून प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे वैद्यकीय संचालनालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधिताना सांगण्यात येत आहे. मात्र, नागपुरात पाचपट मृत्यू वाढल्यानंतरही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात नाही. यावरून येथील प्लाझ्मा थेरपीला फिजिशियन यांच्याकडून बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. 

(संपादन : मेघराज मेश्राम)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will good days come for plasma therapy?