मातेच्या दुधापासून वंचित बाळांना गायी-म्हशीचेच दूध द्यायचे काय? दुधपेढी ठरू नये दिवास्वप्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

मेयोच्या बालरोग विभागाच्या तत्कालीन विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी रोटरीच्या मदतीने या पेढीचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यावेळी जिल्हा विकास नियोजन समितीने मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात ही दुधपेढी व्हावी यासाठी प्रत्येकी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

नागपूर : आईचे दूध हाच नवजात बाळांसाठी सर्वोत्तम पोषण आहार आहे. मात्र, काही कारणांमुळे बाळाला जन्मल्यानंतर सर्वाधिक गरजेचे असलेले दूध मिळत नाही. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. बाळांना आईचे दूध मिळावे यासाठी नागपूरच्या मेडिकल, मेयोसहित राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत "दुधपेढी' (मिल्क बॅंक) तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिल्या आहेत. दुधपेढी निर्माण करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मेयो-मेडिकलमध्येही प्रयत्न सुरू झाले. परंतु, या पेढीसाठी मनुष्यबळ आणायचे कुठून याबाबत साधा उल्लेखही पत्रात नसल्यामुळे ही दुधपेढी दिवास्वप्न ठरणार काय? असे चित्र निर्माण झाले आहे. 

मातेच्या दुधापासून वंचित चिमुकल्यांना गायी-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र, या दुधात पोषणाहारसाठी बहुतेक संरक्षक द्रव्य नसतात. ही बाब लक्षात घेत आईपासून वंचित बाळांसाठी "ह्यूमन मिल्क बॅंक' अर्थात "दुधपेढी'चा पर्याय आहे. पुण्यातील ससूनमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याच धर्तीवर मेडिकल आणि मेयोत हा प्रकल्प उभारण्यासंदर्भात पावले टाकण्यात आली.

हेही वाचा - हृदयद्रावक घटना! आठ महिन्यांची गर्भवती गेली रुग्णालयातून पळून; भूमकाजवळ गेली असता झाला अंत

मेयोच्या बालरोग विभागाच्या तत्कालीन विभागप्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी रोटरीच्या मदतीने या पेढीचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यावेळी जिल्हा विकास नियोजन समितीने मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात ही दुधपेढी व्हावी यासाठी प्रत्येकी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु, मेयोने या प्रकल्पासाठी जागा नसल्याचे सांगून हातवर केले. आता कोरोनाच्या या आणीबाणीत ही दुधपेढी हरवली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

अशी आहे दुधपेढी

प्रसूतीनंतर आईच्या शरीरात दूध नसल्यास बाळाला दूध पाजणे शक्‍य नसते. काही वेळेस आईला गरजेपेक्षा जास्त दूध तयार होते. अशा वेळी दूध फेकून न देता त्यांना हे दूध दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. या दुधाचा उपयोग मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसाठी किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या गंभीर आजार असलेल्या बाळांसाठी केला जातो. प्रसूतीनंतर बाळाला पाजण्यासाठी दूध येत नाही अशा बाळासाठी हे मातेचे दूध वरदान ठरू शकते. यासाठी ही दुधपेढी असणार आहे.

अधिक माहितीसाठी - दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

स्वप्न लवकरच साकार होणार 
मेडिकलमध्ये दुधपेढी तयार होईल. या पेढीसाठी अल्पप्रमाणात मनुष्यबळ लागते. प्रशासनाकडून ते उपलब्ध करून देण्यात येईल. मेडिकलमध्ये दुधपेढी तयार करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. प्रकल्पासाठी जागाही निश्‍चित झाली आहे. 
- डॉ. सजल मित्रा, 
अधिष्ठाता, मेडिकल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the milk bank be established in medical