जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात अडकले पर्यटन; चारऐवजी सहा पर्यटकांना भ्रमंतीच्या परवानगीची प्रतिक्षा

राजेश रामपूरकर
Tuesday, 26 January 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जंगल सफारी करताना जिप्सीत चारच जणांना भ्रमंतीसाठी प्रवेश दिला जात होता.

नागपूर : राज्य सरकार पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असताना पेंच व्याघ्र प्रकल्पात चारच पर्यटकांना भ्रमंतीची परवानगी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडे एका जिप्सीत चारऐवजी सहा पर्यटकांना पर्यटनाची परवानगी मिळावी, यासाठी वन विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे राज्यातीलच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका जिप्सीत सहा पर्यटकांनाच निसर्ग भ्रमंतीची परवानगी दिलेली आहे हे विशेष. 

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जंगल सफारी करताना जिप्सीत चारच जणांना भ्रमंतीसाठी प्रवेश दिला जात होता. मात्र, मध्यप्रदेशातील जिल्हा प्रशासनाने सर्वच प्रकल्पातील जिप्सीत सहा पर्यटकांना निसर्ग भ्रमंतीची परवानगी नोव्हेंबर महिन्यातच दिली. त्यानुसार पर्यटनही सुरू झाले होते. त्यानंतर ताडोबा प्रशासनाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून एका जिप्सीत चार पर्यटकांची मर्यादा वाढवून सहा करण्याची मागणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांना पर्यटनातून मिळणाऱ्या थेट आणि अप्रत्यक्षपणे मिळणारा रोजगार लक्षात घेता तातडीने एका जिप्सीत सहा पर्यटकांना भ्रमंतीची परवानगी दिली. असे असताना नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला-पवनी, मानसिंगदेव या अभयारण्यात अद्यापही एका जिप्सीत चारच पर्यटकांना भ्रमंतीची परवानगी आहे. त्यामुळे पर्यटकांची नाराजी वाढलेली आहे. हे लक्षात घेता पेंच प्रशासनाकडून एका जिप्सीत सहा पर्यटकांना परवानगी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While the state government is trying to promote tourism only four tourists are being allowed to roam in the Pench Tiger Reserve