आयुक्त मुंढेंविरुद्ध सत्ताधाऱ्यांनी का फुंकले रणशिंग ? वाचा

Why did the rulling party blow the trumpet against Commissioner Mundhe?
Why did the rulling party blow the trumpet against Commissioner Mundhe?

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणी करवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही, याबाबतचे देयकेही वाटण्यात आल्याचे नमुद केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आता त्यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले. आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांवर पाणी करात वाढ करण्याचा आयुक्तांचा निर्णय चुकीचा आहे. पुढील तीन दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास १३ ऑॅगस्टपासून भाजपचे सर्व १०८ नगरसेवक आयुक्तांच्या कक्षापुढे आंदोलन करतील, असा इशारा सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी आज दिला.

पाणी शुल्क वाढ करण्यात येऊ नये यासाठी महापौर संदीप जोशी यांनीही आयुक्तांना सूचना केली. मात्र आयुक्तांनी त्याचीही दखल घेतली नाही. प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव स्थायी समितीने परत पाठविला. मात्र त्यावरही आयुक्तांनी उलट उत्तर दिले.

हा प्रस्ताव केवळ नोंदीसाठी पाठविला होता. तो मंजूर करावा अथवा नाही याचा स्थायी समितीला अधिकार नसल्याचे आयुक्तांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले होते. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीत आहे त्यांना पूर्ण पगार मिळत नाही.

वीज कंपनीने तिपटीने वाढवून बिल पाठविले. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांचे कंबरडे मोडले आहे. दरवर्षी ५ टक्के दरवाढीचा निर्णय झाला असला तरी या काळात ती करू नये, अशी मागणी सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी केली. तीन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय न झाल्यास भाजपचे १०८ नगरसेवक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता आयुक्तांच्या कक्षासमोर आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.

 हा आंदोलनाचा पहिला टप्पा असेल, अशी पुस्तीही जोडली. आंदोलनानंतरही निर्णय होत नसेल तर जनआंदोलन पुकारावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सध्याचे पालकमंत्री, आयुक्तांची आणि प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पालकमंत्री डॉ. राऊत यांच्यावरही घणाघात
शहरात जर पाणी शुल्क दरवाढ होत असेल तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सुद्धा राहतील, असा घणाघातही सत्तापक्ष नेते जाधव यांनी केला. आयुक्त उलटसुलट निर्णय घेतात, पालकमंत्री मात्र त्यात हस्तक्षेप करीत नाही. काँग्रेसचे नगरसेवकही मूग गिळून गप्प आहेत, त्यामुळे मुंढे यांना पुढे करून काँग्रेस पक्षाने रचलेले हे षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाही जाधव यांनी व्यक्त केली.

गुडधे म्हणाले भाजपनेच केली वाढ
पाणी दरवाढीचा निर्णय हा आयुक्तांचा नाही. भाजपनेच सभागृहात बहुमताने मंजूर करून घेतलेला निर्णय आहे. त्यावेळी काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. आता, आपले पाप लपविण्यासाठी काँग्रेसवर खोटे आरोप केले जात आहे. संदीप जाधव यांनी जबाबदारीने बोलले पाहीजे. खोटे बोलणे योग्य नाही. तर यासंदर्भात सभागृहात चर्चा करावी, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com