सरकारी कार्यालयातच मिळत नाही साक्षीदार, वाचा संपूर्ण प्रकार 

नीलेश डोये
Thursday, 6 August 2020

चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात दुपारच्या वेळेस एक पार्टी झाली. ही पार्टा एका कंत्राटदाराने दिल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

नागपूर  : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यालयीन कामाच्या वेळेतच जंगी पार्टी झाली. अनेकांनी त्याचा आस्वाद घेतला. प्रकरणाची चौकशी झाली असता एकही साक्षीदार मिळाला नाही. त्यामुळे जेवण केलं कुणी, बाहेरचे लोक जेऊन गेले काय, असे प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी कार्यालयातच साक्षीदार मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, सलील देशमुख यांनी चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश सभेत सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी दिले.

चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात दुपारच्या वेळेस एक पार्टी झाली. ही पार्टा एका कंत्राटदाराने दिल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शासकीय कामकाजाच्या नियमावलीच्या विरोधातील हा प्रकार होता. यामुळे कामकाजावर परिणाम झाला असून, शिस्तभंग केल्याची चर्चा रंगली.

ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...
 

सलील देशमुख यांनी हा मुद्दा एका बैठकीत उपस्थित केला. तत्कालीन सीई़ओ संजय यादव यांनी अतिरिक्त सीईओ कमलकिशोर फुटाणे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत पार्टी झाल्याचा एकही साक्षीदार मिळाला नसल्याचा अहवाल फुटाणे यांनी दिला. त्यामुळे सर्वांनाच क्लिन चिट मिळाली. परंतु यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले. 

 

पार्टीची चर्चा संपूर्ण कार्यालयात 

पाणी पुरवठा विभागात १० वर कर्मचारी आहेत. शिवाय समोर बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. येथेही अनेक कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे या पार्टीची चर्चा संपुर्ण कार्यालयात होती. असे असताना साक्षीदार न मिळाल्याने मोठा आश्चर्य व्यक्त करण्यात येते. त्या दिवशी जेवण कुणी आणले, कार्यालयातील व्यक्ती नाही तर बाहेरचे व्यक्ती जेवले का, मग त्यांना कार्यालयात जेवणाची परवानगी कुणी दिली, कर्मचाऱ्यांनी त्यांना का थांबविले नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Witnesses are not found in government offices