आयुक्त तुकाराम मुंढेंना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

प्रसूती रजा महिलेचा अधिकार असून, तो नाकारण्यात आलाच; शिवाय या रजा घेतल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही आयुक्तांनी दिली, असेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा निषेध करण्यात येत असल्याचे ताशेरे राष्ट्रीय महिला आयोगाने ओढले.

नागपूर : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आज राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली. स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आयुक्त तुकाराम मुंढेंना सात दिवसांत याप्रकरणी संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाचाही कार्यभार आहे. स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अपमानजनक वागणुकीची तक्रारी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. 'आयुक्त तुकाराम मुंढे नेहमीच इतर अधिकाऱ्यांपुढे अपमान करतात. प्रत्येक स्त्री कर्मचाऱ्यांचा अधिकार असलेल्या प्रसूती रजा व लाभही नाकारण्यात आला.

प्रसूतीनंतर कार्यालयात आल्यानंतर आयुक्तांनी कुठल्याही प्रकारच्या प्रसूती रजा व लाभ मागायचे नाही असे बजावले. तीन महिन्यांचे बाळ असल्याने कोविडच्या काळात घरून काम करण्याची परवानगी मागितली असता आयुक्तांनी दिली नाही. स्तनपान माता असल्यामुळे घरी राहणे आवश्‍यक आहे', असेही महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे. आयुक्त मानसिक त्रास देत असल्याचीही तक्रार त्यांनी केली.

या तक्रारीची केवळ दखलच घेतली नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी निषेधही व्यक्त केला. याप्रकरणी संपूर्ण अहवालासह सात दिवसांत माहिती देण्यात यावी, असेही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नोटीसद्वारे आयुक्तांना स्पष्ट केले. एका महिला अधिकाऱ्यानेही आयुक्तांविरुद्ध अपमानजनक वागणुकीची पोलिसांत तक्रार केली आहे. 

हेही वाचा : चित्रपटातील हिरोला देव्हाऱ्यात बसवू नका 

आयुक्तांच्या उत्तराबाबत उत्सुकता 
स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून आयुक्तांविरुद्ध महापौर संदीप जोशी यांनीही पोलिसांत तक्रार केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नोटीसनंतर आयुक्तांच्या अडचणीत वाढ झाली असून ते कुठले उत्तर देतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Commission send Notice to Tukaram Mundhe