हे माहिती आहे का? तुम्ही मरणानंतरही वाचवू शकता तब्बल ८ लोकांचा जीव.. कसा ते वाचा.. 

केवल जीवनतारे 
Wednesday, 12 August 2020

आयएमएच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी म्हणाल्या, आज एक मेंदूमृत व्यक्ती मरणोत्तर आठ लोकांना जीवदान देऊ शकतो. शिवाय टिश्यु (उती)च्या सहाय्याने किमान पन्नास रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल करून जीवन सुखकर करू शकतो

नागपूर:  जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. परंतु, काही जण मृत्यूनंतरही अवयवदानातून दुसऱ्यासाठी जगू शकतात, इतरांना नवीन जीवन देऊ शकतात, तर इतरांच्या डोळ्यांत प्रकाश पेरू शकतात. एक व्यक्ती आठ लोकांना अवयवदान करू शकतो. मृत्यूनंतर किमान आठ लोकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी अवयव दान करण्यासाठी मरणोत्तर पुढाकार घ्यावा असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित अवयवदान जनजागृती सोहळ्यातून किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते यांनी केले.

आयएमएच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी म्हणाल्या, आज एक मेंदूमृत व्यक्ती मरणोत्तर आठ लोकांना जीवदान देऊ शकतो. शिवाय टिश्यु (उती)च्या सहाय्याने किमान पन्नास रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल करून जीवन सुखकर करू शकतो. काही कारणांनी व्यक्तीचे अवयव निकामे झाल्यावर अत्याधुनिक प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ते अवयव बदलविता येतात. त्यासाठी अवयवदानाचा धर्म निभावणे ही काळाची गरज बनली आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! त्यांच्या नशिबी मरणानंतरही लॉकडाउन.. कित्येक दिवसांपासून कोरोनामृतांच्या अस्थी स्मशानातच 

रुग्णास जीवित व्यक्ती अथवा मृत व्यक्ती अवयवदान करू शकतो. सध्या जीवंत व्यक्तींद्वारे करण्यात येणारे अवयवदानाचा टक्का मोठा आहे. मात्र, त्यामुळे प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या फार कमी लोकांना अवयव मिळत आहेत. अशा वेळी मेंदूमृत अथवा मरणोत्तर अवयवदानाचा टक्का वाढला तर अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतील. दोन प्रकारे अवयवदान करता येते. 

जीवंत व्यक्तीसही करता येते अवयवदान

पहिला म्हणजे लिव्हिंग डोनर ऑरगन डोनेशन. यामध्ये जीवंत व्यक्ती आपल्या आप्तस्वकीयास मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत अशा अवयवांचे दान करू शकतो. हृदयविकाराने अथवा मेंदूमृत पावल्याने निधन झाल्यास मुत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुस, आतडे या अवयवांसह डोळ्यांच्या कॉर्निया, त्वचा, बोन मॅरो, हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्या यांचेही दान करता येते. जीवंत व्यक्तीस अवयवदान करावयाचे असल्यास किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे. मात्र, शारीरिक परिस्थितीवरून डॉक्टर व्यक्ती अवयवदानास पात्र आहे की नाही, हे ठरवितात. 

क्लिक करा- विश्वास बसेल का? या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण..नागरिकांना दर्जेदार सुविधा.. स्मार्ट सरपंचाचे स्मार्ट गाव..वाचा या गावाची यशोगाथा

आजच करा संकल्प 

सोबतच रुग्णाला एचआयव्ही, हेपटायटिस बी, मधूमेह, कर्करोग असे विकार नकोत. जगभरातील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, अगदी सत्तरी व ऐंशीच्या वयात अवयदान व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. मेंदूमृत व्यक्ती अथवा मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी वयाची अट नाही. अवयदानाचा आजच संकल्प करा असे आवाहन शाखेचे सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांनी केले.

डॉक्टरांना करा विचारणा 
प्रत्येक मृत्युमध्ये अवयवदानाची संधी असू शकते. अपघात अथवा इस्पितळात मृत्यु झाला तर नातेवाईकांनी डॉक्टरांना अवयवदानाची संधी आहे का, यासंबंधी विचारण केली पाहिजे. अवयवदान करण्याची संधी असेल तर ते घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.
-डॉ. संजय कोलते
 सचिव, झोनल ट्रान्सप्लांट का-ऑर्डिनेशन सेंटर, नागपूर

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you can save life of 8 person by donating organs