चक्क माणसाएवढ्या पाण्यातून जावे लागते शेतात !

जलालखेडाः बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे शेतात पाणी साचून कापसाचे पिकाचे नुकसान होत आहे.
जलालखेडाः बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे शेतात पाणी साचून कापसाचे पिकाचे नुकसान होत आहे.

जलालखेडा (जि.नागपूर): एकीकडे निसर्गाने यावर्षी शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. वरचे पाणी सतत सुरु असल्यामुळे आधीच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाचा गलथानपणाही शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. बंधारा बंद केल्यानंतर पाणी कुठपर्यंत थांबू शकेल, याचा अंदाज न घेता काम केल्यामुळे आता बंधारा अर्धाच बंद केल्यानंतरही पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात जा ये करण्यासाठी असलेल्या रस्त्यावर माणसाएवढे पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून वाट करीत शेतात जावे लागत आहे. हा सर्व प्रकार नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी येथील बंधाऱ्यामुळे घडला आहे.

‘बॅकवॉटर’ शिरले शेतकऱ्यांच्या शेतात
नरखेड तालुक्यातील चांदणीबर्डी येथील भाकरे महाराज मठाजवळून मोठा नाला वाहतो. या नाल्यावर बऱ्याच वर्षांपूर्वी पूल-कम बंधारा बांधण्यात आला होता. पण बंधारा बऱ्याच वर्षांपासून खराब झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभ होत नव्हता. तसेच पूलदेखील धोकादायक झाला होता. यामुळे काही वर्षांपूर्वी नवीन पूल निर्माण करून वर्दळीसाठी खुला करण्यात आला. पण बंधारा मात्र कुचकामी ठरत असून त्याची दुरुस्ती मात्र करण्यात आली नव्हती. शेवटी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून सन २०१८-१९ मध्ये या बंधाऱ्याची खनिकर्म विभागाच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

३५ लाखांचा निधी पाण्यात
बंधाऱ्याच्या पाट्या लागल्या व बंधाऱ्यात पाणी अडले तर याचा शेतीसाठी लाभ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. म्हणूनच ते बंधारा दुरुस्त होऊन पाणी अडावे यासाठी प्रयत्नशील होते. पण झाले ते उलटेच, बंधाऱ्याच्या पाट्या लावल्या, पण त्याही अर्ध्याच व पाट्यांतून पाणी झिरपत असतानादेखील बॅकवॉटर हे शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. जर पूर्ण पाट्या लावल्या व पाणी झिरपले नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्ती करताना बॅकवॉटर हे कुठपर्यंत व कसे थांबणार आहे, याचे साधे गणित अभियंता यांना न जमल्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्च केलेला ३५ लाखाचा निधी पाण्यात गेल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे लाभ कमी व नुकसानच जास्त
बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन पाणी सिंचनाकरिता कमी यावे, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी प्रयत्न केले, त्यात मी ही होतो. पण अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे लाभ कमी व नुकसानच जास्त होणार असल्याची कल्पना असती तर या कामामागे लागलो नसतो. आधीच निसर्गाने जेरीस आणले आहे व आता बंधाऱ्याचे पाणी शेतात शिरत असल्यामुळे पिक हाती येणार की नाही, अशा परिस्थिती निर्माण झाली आहे.
-मारोतराव टेकाडे, नुकसानग्रस्त शेतकरी, चांदणीबर्डी

पुढे काय करायचे हे नियोजन होणार
बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती नाही. पाट्या लावण्यास सांगण्यात आले होते. मात्र यानंतर काय झाले याची माहिती घेतली नाही. तरी पण बंधाऱ्यामुळे नुकसान होत असेल तर पाट्या काढल्या जाईल. बॅकवॉटर कुठपर्यंत जाईल याचे निदान न आल्यामुळे हे झाले असेल. आता पुढे काय करता येईल याचे नियोजन करण्यात येणार आहे.
-श्री दशपुत्रे
अभियंता, जि. प. लघु सिंचन विभाग नरखेड
 
नियोजन करण्याचे आदेश येईल
बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. यावर ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. पण अजूनही पूर्ण निधी उपलब्ध न झाल्यामुळे काम पूर्ण झाले नाही. बंधाऱ्यात पाट्या टाकल्या, पण यामुळे शेतात पाणी शिरत असेल तर अधिकाऱ्यांना भेट देऊन पुढील कामाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात येईल.
श्री. भूत
उपविभागीय अभियंता
जि.प.लघु सिंचन विभाग, नरखेड

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com