शू...आमच्या गावात तुम्हाला प्रवेश नाही बरं का !

टाकळघाट :  गावबंदी करताना युवक.
टाकळघाट : गावबंदी करताना युवक.

कोदामेंढी (जि.नागपूर):  दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण वाढू लागले आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने सुरक्षित कसे राहता येईल, याची दक्षता गावकरी घेत आहेत. गावबंदी करण्याचे आदेश कुठल्याही स्तरावर प्रशासनाने दिले नसले तरी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. नागपूर जिल्हा "रेडझोन'मध्ये आहे. मौदा तालुक्‍याच्या सीमेलगत भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे. नागपूर शहरात कोरोनाने हाहाकार माजविला असून लॉकडाउनमुळे ग्रामीण भाग सुरक्षित आहे.

गावबंदीचे पाऊल उचलून ठिकठिकाणी नाकाबंदी
कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊ नये, म्हणून मौदा तालुक्‍यातील बऱ्यांच गावांतील लोकांनी गावबंदीचे पाऊल उचलून ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. काही नियम व अटी लावून बाहेरील आणि शहरातील लोकांना गावात प्रवेश नाकारला आहे. रामटेक भंडारा मार्गावर जिल्ह्याच्या सीमेलगत पोलिसांची नाकाबंदी असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना भंडारा जिल्ह्यात प्रवेश नाकारला आहे. बऱ्यांच सीमेलगत असलेल्या गावातील लोकांनी रस्त्यावर झाडाचे खोड आडवे केले, तर काही ठिकाणी नाल्या खोदून रस्ते बंद केले. कोदामेंढी, निमखेडा, अरोली येथे दुपारी दोननंतर संपूर्ण दुकाने बंद करून बाहेरील लोकांना गावात प्रवेश नाकारला आहे.

भंडारा, नागपूर जिल्ह्यांतील लोकांचे संपर्क तुटलेले
कोदामेंढी येथे तर चक्क चेक पोस्ट लावून निगराणी ठेवल्या जात आहे. नियमाचे उल्लंघन करून सहकार्य न करणाऱ्या दुकानदारांवर दंडदेखील ठोठावला. मौदा तालुक्‍यातील धानोली, सीतेपार, मुरमाडी खिडकी आदी गावे भंडारा सीमेलगतची असल्याने या गावातील लोकांनी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील लोकांचे संपर्क तुटलेले आहेत.

टाकळघाटच्या सीमा बंद
टाकळघाट :  औद्योगिक परिसरात ये-जा करणाऱ्या बाहेरील कामगारांची टाकळघाट परिसरात सतत रेलचेल सुरू आहे. तसेच नागपूरवरून ये-जा करणाऱ्या मालवाहतूक गाड्या, दुचाकी, भाजीपाला, चारचाकी, काही व्यावसायिक सरळ टाकळघाट गावात प्रवेश करतात, यापासून येथील नागरिकांना कोविड- 19 चे संक्रमण होऊ शकते म्हणून येथील युवक तसेच गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेऊन आज ग्रामपंचायत प्रशासनाला व एमआयडीसी पोलिस ठाण्याला बंद करण्याचे निवेदन दिले. कृष्णा नदीच्या पुलावर चेक पोस्ट लावून बाहेरून ये-जा करणाऱ्या व्यक्‍तींच्या नोंदी करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे गावात कोरोनासंदर्भात गावबंदी करण्याचा ठराव घेतला असून, तहसीलदारांना पाठविला असल्याचे सरपंचांनी सांगितले. परंतु, त्याचा पाठपुरावा झाला नसल्याने कोरोना गावात शिरू नये म्हणून नागरिकांनीच पाऊल पुढे केले आहे. त्याचबरोबर लॉकडाउन सुरू असताना बाहेरील व्यवसायिक सकाळच्या सुमारास येऊन आपली दुकाने चोरट्या मार्गाने दुकानांचे शेटर उघडून आपला व्यवसाय करतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येते. हा सर्व प्रकार स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे घडत असल्याची चर्चा नागरिकांत दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com