एक्‍स्पर्ट असूनही युवकाने गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

महाविद्यालयात त्याला बाइक रायडर नावाने ओळखले जायचे. बाइकवरील एक्‍स्पर्टपणामुळे तो कॉलेजमध्ये सर्वांच्या परिचयाचा होता. मात्र, हाच एक्‍स्पर्टपणा त्याला महाग पडला.

नागपूर : अनेक तरुण बाइक चालविण्यात एक्‍स्पर्ट असतात. मात्र, त्यापैकी काही जण आपला जीव गमावतात. कारण त्यांना वेगाशी स्पर्धा करण्याची सवय जडली असते. नागपुरातील अशाच एका एक्‍स्पर्ट असलेल्या तरुणाला अतिआत्मविश्‍वास नडला व त्याला जीव गमवावा लागला.

महाविद्यालयात त्याला बाइक रायडर नावाने ओळखले जायचे. बाइकवरील एक्‍स्पर्टपणामुळे तो कॉलेजमध्ये सर्वांच्या परिचयाचा होता. मात्र, हाच एक्‍स्पर्टपणा त्याला महाग पडला. अतुल ऊर्फ स्वप्निल कृष्णा पाठक (23, रा. होमगार्ड कार्यालयाजवळ, कॉंग्रेसनगर) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. बाइक पळविताना अतिआत्मविश्‍वास नडल्यामुळे अतुलचा बळी गेल्याची चर्चा आहे. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाजवळ रविवारी रात्री 11.25 च्या सुमारास घडली.

अवश्य वाचा - 50 वर्षीय महिलेवर जडले 20 वर्षीय युवकाचे प्रेम, पहाटे घरात घुसून केली ही मागणी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल हा धनवटे नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याला बाइक रायडर नावाने ओळखल्या जात होते. बाइक चालविण्यात तो एक्‍स्पर्ट होता. रात्री आपल्या (एमएच-31, एफएस-4515) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात होता. त्यावेळी मेट्रो स्थानकाजवळ गतिरोधक असल्याने त्याला समजले नाही व वाहन भरधाव असल्याने गतिरोधकवरून तो उसळला. जमिनीवर पडून डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा - गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी अवलंबला वाममार्ग, पोलिसांनी सापळा रचला आणि...

हेल्मेट असते तर...
बाइक चालविण्यात एक्‍स्पर्ट असलेल्या अतुलने दुचाकी चालविताना डोक्‍यात हेल्मेट घातले नव्हते. रात्रीची वेळ असतान मेट्रो पुलाखाली अंधार असल्यामुळे अतुलला खड्‌डा दिसला नाही. त्यामुळे दुचाकी उसळून तो जवळपास 70 फुटापर्यंत फेकला गेला. जर अतुलच्या डोक्‍यात हेल्मेट असते तर जखमी झाला असता, परंतु त्याचा जीव निश्‍चितच वाचला असता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Bike Rider lost the life in Nagpur