विदेशी तरुणाशी फेसबुकवर फुलले प्रेम आणि बदल्यात मिळाले हे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

हैदराबादच्या आयटी कंपनीत नोकरीवर असलेल्या उच्चशिक्षित तरुणीला विदेशी तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. गिफ्टच्या नावावर वेळवेळी पैसे घेत पाच लाखांनी फसवणूक केली. 

नागपूर : नागपुरातील उच्चशिक्षित तरुणी हैदराबादच्या आयटी कंपनीत काम करते. फेसबुकवरून तिची ओळख विदेशी तरुणाशी झाली. एकेदिवशी तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली. तरुणीनेही होकार दिल्याने विदेशी नवऱ्याचा मोह चांगलाच महागात पडला. पाच लाखांहून अधिकची रक्कम गमावण्याची वेळ तिच्यावर आली. दुसरीकडे पैसे देणाऱ्यांनी घरावर धडकून कुलूप ठोकले. अजनी हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. फसगत झालेली 27 वर्षीय तरुणी रुचिका रामेश्‍वरी, रिंग रोड, शताब्दी चौक येथील काशीनगरात वास्तव्यास आहे. 

प्राप्त माहितीनुसार, रुचिका अभियंता असून हैदराबादच्या आयटी कंपनीत कामाला होती. त्याचदरम्यान तिची फेसबुकवरून एका विदेशी तरुणाशी ओळख झाली. मायकल फ्रॅन्क नाव सागणाऱ्या जर्मनीच्या युवकाने तिच्यावर जाळे फेकले. दोघांची फेसबुकवरील मैत्री चॅटिंगच्या माध्यमातून वाढत गेली. एक दिवस त्या तरुणाने लग्नाची मागणी घातली. तरुणीनेही होकार कळविला. 

अधिक माहितीसाठी - दोन भावंडांनी प्यायली दारू अन्‌ घडले हे...

मार्च 2019 पासून त्यांचे बोलणे आणखी वाढले. त्याने महागडे गिफ्ट पाठविले असून, ते दिल्ली विमानतळावरून मिळविण्यास तरुणीला सांगितले. काही दिवसांनी तरुणीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमचे पार्सल दिल्ली विमानतळावर असून, पैसे भरून गिफ्ट घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे प्रारंभी तिने आपल्याकडील काही रक्कम भरली. वेगवेगळ्या कारणाने तिला पैसे जमा करण्यास सांगण्यात येत होते. 

पैसे नसल्याने तिने नागपूर गाठून परिचयात असणाऱ्या सोनेगावच्या शबनम शेख व सुभाषनगरात राहणाऱ्या प्रीती रायपुरे-सोमकुवरकडून उधारीवर पैसे घेतले. पैसे देतानाच ते 15 दिवसांत परत करू न शकल्यास घरावर ताबा मिळविण्यासंदर्भात स्टॅम्पपेवरवर लिहून घेतले. थोडे थोडे करीत तिने तब्बल पाच लाख 15 हजार 345 रुपयांचा भरणा केला. पण, गिफ्ट काही मिळाले नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. 

हेही वाचा - अंघोळ करीत होती महिला अन् युवकाने साधली ही संधी...

बहीण, आईला मारहाण

रुचिकाला अपली फसगत झाल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पैसे परत मिळण्यासाठी शबनम आणि प्रीतीने दबाव टाकणे सुरू केले. तिच्या घरी जाऊन बहीण व आईला मारहाण करीत धमकावले. स्टॅम्प पेपर दाखवून घरातील सामान बाहेर फेकून कुलूप ठोकले. ही बाबसुद्धा बेकायदेशीर असल्याने तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी फ्रॅन्कसह शबनम व प्रीतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young girl cheats in Nagpur