रक्‍ताने माखलेल्या मृतदेहामुळे पारडीत खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

मृत युवकाची अद्याप ओळख पटली नाही. अनैसर्गिक कृत्यातून ही हत्येची घटना घडली असवी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

नागपूर : युवकाचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून आरोपींनी पळ काढला. ही थरारक घटना पारडी पोलिस ठाण्यांतर्गत कापसी (खुर्द) आऊटर रिंग रोडवर आज, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कापसी (खुर्द) नागपूर हैदराबाद आऊटर रिंग रोडवर एका 25 वर्षीय युवकाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. डोक्‍यावर दगडाने वार केल्याच्या गंभीर जखमा आहे. मृत युवकाची अद्याप ओळख पटली नाही. अनैसर्गिक कृत्यातून ही हत्येची घटना घडली असवी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सहा वर्षीय चिमुकलीचे तोंड दाबले, तिला गल्लीत नेले आणि...

यासंदर्भात पारडी पोलिसांना नियंत्रण कक्षाने माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी पथकासह वेळीच घटनास्थळ गाठले. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्‍याच्या मागील बाजूला गंभीर जखम आहे. तर अंगावर एक टी शर्ट आणि जिन्स पॅन्ट असून, पॅन्ट अर्धा गुडघ्यापर्यंत खाली उतरलेला होता.

मृत आढळलेला युवकाचा पॅंट अर्धवट काढलेला आहे. अर्धनग्न अवस्थेत मृतदेह असल्यामुळे खून करण्यापूर्वी युवकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे कुणीतरी विकृतीतून हा खून केला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिकदृष्ट्या युवकाची अवस्था बघून कुणी मजूर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी पारडी पोलिसांनी तपास सुरू केला.

मृतक युवक कोण, हत्या कुणी आणि का? केली, याचे गूढ कायम आहे. याप्रकरणी पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील हत्याकांडाची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोनेगाव, हिंगणा आणि नंदनवननंतर आता पारडी पोलिस ठाण्यात हत्याकांड उघडकीस आले. गेल्या तीन दिवसांतील हे तिसरे हत्याकांड असून, यावरून शहरातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man Murder by stoning in pardi