मैत्रिणीच्या लग्नात डीजेवर धरला ठेका अन्‌ निघाल्या तलवारी, वाचा काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

नाचताना निखिलचा धक्‍का वरपक्षाकडील एका युवकाला लागला. त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. मात्र, लग्नातील काही नातेवाईकांनी समजूत घालून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : लग्न समारंभात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वर-वधू यांच्या नातेवाईकांत हाणामारी झाली. वराकडून आलेल्या युवकांनी अचाकन तलवारी काढून सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाले. हा थरार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जुना कामठी रोडवरील अमन लॉनमध्ये घडला. निखिल हरीदार लोखंडे (वय 29, रा. पंचशिल बौद्ध विहार, कळमना) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्‍की सुनील डोंगरे (वय 28, रा. गोरेवाडा) याच्या मैत्रिणीचे लग्न सोमवारी रात्री कामठी रोडवरील अमन सेलिब्रेशन लॉनमध्ये आयोजिण्यात आले होते. त्यामुळे विक्‍की हा मित्रांसह लग्नाला गेला होता. त्याच्यासोबत निखिल लोखंडे आणि अन्य सहा मित्र होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास लॉनमध्ये सुरू असलेल्या डीजेवर वरपक्षांकडील युवक डान्स करीत होते. 

अधिक वाचा - फक्त पंधरा हजारांत तुमच्या मुलाच्या प्रेमप्रकरणाचा निपटारा करून देतो, मग...

दरम्यान विक्‍की आणि निखिल यांच्यासह मित्रही नाचायला गेले. नाचताना निखिलचा धक्‍का वरपक्षाकडील एका युवकाला लागला. त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. मात्र, लग्नातील काही नातेवाईकांनी समजूत घालून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. तासभर वातावरण शांत झाल्यानंतर वरपक्षाकडून आलेल्या काही युवकांनी बाहेर असलेल्या मित्रांना फोन करून शस्त्रासह लॉनमध्ये येण्यास सांगितले. 

काही वेळातच अचानक दहा ते पंधरा जण तलवारी आणि चाकू घेऊन धावून आले. त्यामुळे विक्‍की, निखिल आणि त्यांच्या मित्रांना काहीही सूचले नाही. जीव जाण्याच्या आकांताने हे सर्व जण लॉनमध्ये इकडेतिकडे पळू लागले. वरपक्षाकडील युवकांनी त्यांना पळवून-पळवून मारहाण करण्यास सुरुवात केली. निखिलच्या छातीत आणि पोटात तलवार खूपसल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर त्याच्या अन्य चार मित्रांवरही धारदार शस्त्रांने हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - हे काय, जागेचा ताबा मिळण्यासाठी केली त्याने "वीरूगिरी'

हत्याकांडाचा गुन्हा दाखल

काही वेळातच कळमन्याचे ठाणेदार विश्‍वनाथ चव्हाण पथकासह दाखल झाले. त्यांनी जखमींना मेयोत दाखल केले तर निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी विक्‍कीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलिस घेत असून, त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. गुन्हे शाखेनेही या हत्याकांडातील आरोपींचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man murdered at a wedding in Nagpur